टोरेस कंपनी घोटाळ्यातील तिघांना अटक, संस्थापक फरार

0

मुंबई : मुंबईतल्या टोरेस कंपनीने सव्वा लाखाहून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे हजार कोटींची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या फसवणुकीचा आकडा आठ ते दहा हजार कोटीपर्यंत जाऊ शकतो. तर फसवणूक केल्यानंतर पळण्याच्या तयारीत असलेल्या संचालकासह, जनरल मॅनेजर आणि स्टोअर मॅनेजरला शिवाजी पार्क पोलिसांनी मंगळवारी अटक केली. कंपनीचा संस्थापक मात्र युक्रेनला पसार झाला आहे. अटक केलेल्यांमध्ये एक जण रशिया, तर दुसरा उझबेकिस्तनामधील रहिवासी आहे.

शिवाजी पार्क पोलिसांनी उझबेकिस्तानची रहिवासी असलेली जनरल मॅनेजर तानिया कसातोवा, संचालक सर्वेश अशोक सुर्वे आणि रशियन नागरिक असलेली स्टोअर मॅनेजर व्हॅलेंटिना गणेश कुमार या तिघांना अटक केली आहे. तिघेही दादर कार्यालयातील रक्कम, दागिने घेऊन पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. कंपनीचा संस्थापक जॉर्न कार्टर आणि व्हिक्टोरीया कोवालेंको हे दोघेही युक्रेनला पसार झाल्याचे समजते.ते दोघेच या घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचे समजते. मुख्य कार्यकारी अधिकारी असलेला तौफिक रियाज आणि सीए अभिषेक गुप्ता दोघेही भारतात असून, त्यांच्याविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. मुंबईचा रहिवासी असलेला आरोपी सर्वेश अशोक सुर्वे हा आधार कार्ड ऑपरेटर म्हणून काम करीत होता. त्याला कंपनीचा संचालक बनवण्यासाठी त्याचे नाव, आधार कार्ड आणि डिजिटल सहीचा वापर करण्यात आला. त्याला दरमहा रोखीने २२ हजार रुपये पगार दिला जात होता, असे त्याच्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे. त्याला डोंगरीतील उमरखाडी परिसरातून अटक करण्यात आली.

टोरेस ज्वेलर्स कंपनीने गुंतवणूकदारांसाठी आकर्षक परताव्याची योजना सुरू केली होती. कंपनीने दादर, गिरगाव, कांदिवली, कल्याण, सानपाडा, मीरा रोड या सहा ठिकाणी शाखा उघडल्या होत्या. सर्वच ठिकाणी लाखो गुंतवणूकदारांनी या योजनेत पैसे गुंतवले होते. काही महिने सुरूवातीला चार टक्के आणि नंतर दहा टक्के परतावा देण्यात आला. पण मागील दोन आठवडे परताना न मिळाल्याने फसणुकीचा प्रकार समोर आला. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानेही मंगळवारी या फसवणूक प्रकरणाचा आढावा घेतला. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करणार आहे. आतापर्यंत याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी टोरेसच्या दुकानांबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी करत आपला रोष व्यक्त केला. हा घोटाळा काही हजार कोटींचा असल्याची प्राथमिक माहिती आहे.तर सुमारे तीन लाख गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech