पाटणा : पहलगाम येथील हल्ला हा भारतामातेच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे, या हल्ल्याने देश शोकसागरात बुडाला आहे. पण, ज्या हल्लेखोरांनी हा हल्ला केला, त्यांना कल्पनेतही येणार नाही अशी शिक्षा देणार, आता त्यांची शिल्लक राहिलेली जमिनही मातीत गाडण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसह दहशतवाद्यांना इशारा दिला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी बिहार दौऱ्यावर होते. येथील जनतेला संबोधित करण्यापूर्वी आपल्या भाषणाआधी त्यांनी दोन मिनिटे मौन बाळगत पहलगाम हल्ल्यातील मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी, बोलताना पहलगाम हल्ल्यातील घटनेवर मोदींनी दु:ख व्यक्त केले.
बिहारच्या भूमीतून, मी संपूर्ण जगाला सांगतो की, भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या प्रमुखांना शोधून काढेल, कठोरातील कठोर शिक्षा देईल. ते जगाच्या पाठीवर कुठेही लपले तरी त्यांना शोधून काढू. भारताचं स्पीरिट, भारताचं धैर्य दहशतवाद्यांच्या कृत्यांमुळे खचणार नाही, दहशतवादाला कदापि माफी मिळणार नाही. या प्रकरणात योग्य न्याय होईलच, यासाठी सर्व ते प्रयत्न करु. हाच निर्धार प्रत्येक भारतीयाचा आहे. माणुसकीवर विश्वास ठेवणाऱ्या जगातील प्रत्येक देश आणि त्यांच्या नेत्यांचे आभार, असे मोदी म्हणाले.
देशात आज कोटी कोटी भारतीय रडत आहेत, मृत पर्यटकांचे कुटुंबीय आक्रोश करत आहेत. पण, आज संपूर्ण देश या कुटुंबीयांसोबत आहे. या हल्ल्यात अनेकांनी आपला जोडीदार गमावला, काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत आपलं दु:ख एकसारखंच आहे, आपला आक्रोश एकसारखाच आहे. हा हल्ला पर्यटकांवर झाला नसून भारताच्या दुश्मनांनी देशाच्या आत्म्यावर हा हल्ला केला आहे. ज्यांनी हा हल्ला केला, त्या दहशतवाद्यांना आणि कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा देणार, शिक्षा देणारच. तसेच, उनकी बची-कुची जमिन को भी मिठ्ठी मे मिलाने का समय आ गया है… असेही ते म्हणाले.