मुंबई – दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या दृष्टीने शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. यावेळी संचालक सहआयुक्त आयुक्त कार्यालय चंद्रशेखर चोरे, सहआयुक्त परिमंडळ ४ विश्वास शंकरवार, उपायुक्त पायाभूत सुविधा महाले उपायुक्त किरण दिघावकर, व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी दिंडोशी विधानसभा क्षेत्रात होणारा अपुरा पाणीपुरवठा नियमित करण्यासंदर्भात तसेच नागरी निवारा मध्ये नविन जल वहिनी टाकणे जल अभियंता माळवदे यांच्या सोबत चर्चा झाली. दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील वन क्षेत्रात केमिकल बायो टॉयलेट बसविण्याची मागणी केली त्या नुसार ७ नविन बायो टॉयलेट लावण्यात येणार असून इतर आवश्यक ठिकाणी देखील लावण्यात येतील अशी माहिती किरण दिघावकर यांनी दिली.
पिंपरी पाडा ते जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग यांना जोडणारा १२० फुटाचा डीपी रस्ता, संस्कार कॉलेजातील प्रस्तावित विकास नियोजन रस्ता देखील टप्प्याटप्प्याने विकसित करण्याबाबतची माहिती आयुक्तांनी दिली. या रस्त्यांच्या विकासात बाधित होणाऱ्या पात्र घरांचे पुनर्वसन करण्याकरिता महापालिका पिटीसी स्थानिक क्षेत्रातच विकत घेऊन तेथे पात्र नागरिकांचे पुनर्वसन करून रस्ता विकसित करण्यात येणार आहे. तसेच बाधित होणाऱ्या व्यावसायिक गाड्यांना रेडिरेकर रेट प्रमाणे आर्थिक मोबदला देऊन अथवा नव्याने निर्माण होणाऱ्या मंडईमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. स्थळ परिस्थितीनुसार रस्ते विकासात बाधित होणाऱ्या घरांचे स्थलांतर आजूबाजूला सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात समाविष्ट करून रस्त्याचा विकास करण्यात येणार आहे. रस्ते विकासासोबतच दिंडोशी विधानसभा क्षेत्रात आवश्यक ठिकाणी रस्ते विभाग व मलनिःसारण विभाग यांच्या सह समन्वयाने मलनिःसारण वाहिन्या देखील बनविण्यात येणार आहेत. या अंतर्गत तानाजी नगर ते आर दक्षिण विभाग हद्द येथ पर्यंत मलनिःसारण वहिनी टाकण्याची मागणी करण्यात आली. तसेच अतिवृष्टीमुळे रस्ते खराब झाल्याने रस्त्यांचे समतलिकरण करावे अशी मागणी केली असता हे काम लवकरात लवकर करण्यात येईल अशी माहिती उप प्रमुख अभियंता रस्ते पश्चिम उपनगरे बोरसे यांनी दिली.
इतर रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू होईल अशी माहिती बोरसे यांनी दिली. तसेच यावेळी वन खात्याच्या जमिनीवरील झोपड्यांना मूलभूत सुविधा देणे, शौचालय दुरुस्ती, जल जोडणी देणे बाबत धोरण तयार करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी आमदार प्रभू यांनी केली. त्यासोबतच आवश्यक ठिकाणी घर गल्ल्या, गटारे, पदपथ, सभा मंडप दुरुस्त करण्यात यावेत अशी मागणी देखील आमदार सुनील प्रभु यांनी केली.