नवी दिल्ली : सहकाराच्या नावाखाली काँग्रेसने ५० वर्ष फक्त भ्रष्टाचारच केला आहे. केंद्रातील युतीच्या सरकारने नवसंशोधन व पारदर्शकता आणून सहकार क्षेत्राला समृद्धीच्या दिशेने नेले आहे. सहकारी व्यवस्थापन आणि त्याच्या शिक्षणाला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकाने नवे त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय विधेयक २०२५ आणले आहे. हे विधेयक सहकार क्षेत्राला दिशा देणारे ठरणारे आहे. स्वातंत्र्यापासून भ्रष्टाचाराला शिष्टाचार मानणारी काँग्रेस आणि उबाठा पक्षाची अभद्र आघाडी `इंडि’ नसून `औरंगजेब फॅन क्लब’ असल्याची घाणाघाती टीका ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज संसदेत केली. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी संसदेत त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय विधेयक २०२५ सादर केले आहे. या विधेयकावर शिवसेना पक्षाच्या वतीने बाजू मांडण्याची संधी दिल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्ष प्रतोद खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे प्रारंभी आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या दूरदृष्टीमुळे सहकार क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा घडून आल्या आहेत. आज `सहकार’ आणि `सरकार’ दोन्ही मजबूत होत आहेत. गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी कलम ३७० हटवून देशाच्या एकतेला नवा आयाम दिला आणि आता सहकारी क्षेत्रात सुधारणा करून लोकांना सक्षम बनवत आहेत. या उलट काँग्रेसच्या काळात सहकार क्षेत्राचा वापर भ्रष्टाचारासाठी केला गेला. जिथे आमच्या काळात `सहकारातून समृद्धी’ येत आहे, तिथे काँग्रेसने शेतकऱ्यांचे पैसे लुटून सहकार क्षेत्राला भ्रष्टाचाराचे अड्डे बनवले. ही तीच काँग्रेस आहे जी देशाच्या विकासावर गोचडीसारखी चिकटून राहिली. आज ते औरंगजेबच्या नावाने राजकारण करत आहेत, पण इतिहास सांगतो की औरंगजेबने `जिझिया कर’ लावून हिंदू धर्म संपवण्याचा प्रयत्न केला. तसेच काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी अनेक घोटाळे करून देशाला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचे काम केले. ही `इंडि’ आघाडी नसून ‘औरंगजेब फॅन क्लब’ असल्याची टीका खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
यावेळी विरोधी पक्षातील खासदारांनी गोंधळ घालत खासदार नरेश म्हस्के यांचे भाषण बंद पडण्याचा प्रयत्न केला. उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी `पॉईंट ऑफ ऑर्डर’ करत सभापतींकडे भाषण थांबविण्याची मागणी केली. संसदेतील ज्येष्ठ खासदार नारायण राणे, खासदार निशिकांत दुबे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शन जरदोश आणि इतर ज्येष्ठ खासदारांनी नरेश म्हस्के यांची बाजू घेत विरोधी पक्षाची मागणी धुडकावून लावत `पॉईंट ऑफ ऑर्डर’ची हवाच काढली.
त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय विधेयक भारतातील सहकारी चळवळीला नवीन उंचीवर नेईल आणि जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनण्यासाठी सक्षम आहे. या विधेयकामुळे गुजरातमधील `इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंद’ (IRMA) ला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा दिला जाईल. सहकार क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनावर भर दिला जाईल. विद्यापीठाला डिग्री कोर्स, डिस्टन्स लर्निंग, ई-लर्निंग आणि देश-विदेशात शाखा स्थापन करण्याचा अधिकार असेल. ५०० कोटींच्या भौतिक संरचनेच्या निर्मितीसाठी सरकारने यात तरतूद केली आहे. त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक २०२५ हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. सहकारी क्रांतीला मजबुती मिळावी यासाठी संसदेतील सर्व खासदारांनी या विधेयकास पाठिंबा द्यावा, असे आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी शेवटी केले.