वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून प्रचंड आक्रमक होत अनेक कठोर निर्णय घेतले. यामुळे त्यांनी गेल्या ४३ दिवसांत अमेरिकेतच नाही तर जगभरात मोठी खळबळ उडवून दिली आहे.अशातच ट्रम्प यांनी अमेरिकी सिनेटला संबोधित करताना भारतासह अन्य देशांची नावे घेत येत्या २ एप्रिलपासून या देशांवर परस्पर कर लादणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.
हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज चेंबरमधून सभागृहाला डोनाल्ड ट्रम्प यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी आपण गेल्या ४२ दिवसांत अमेरिकेसाठी जे केले ते मागील सरकारने ४ वर्षांत केले नाही असा दावा केला आहे. अमेरिकेला पुन्हा परवडणारा देश बनवायचे आहे. आता आम्ही वोक राहणार नाही. कॅनडा, मेक्सिको, भारत आणि दक्षिण कोरिया सारखे अनेक देश आपल्या उत्पादनांवर मोठे टेरिफ लादतात. आता आम्ही या देशांवर येत्या २ एप्रिलपासून परस्पर कर लादणार आहोत, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे.
आमच्याकडून लुटलेले पैसे वसूल करून अमेरिकेतील महागाई कमी केली जाणार आहे. मी अजूनही बायडेन यांच्या अयशस्वी धोरणांना दुरुस्त करण्याचे काम करत आहे. अमेरिकेत आता दोनच जेंडर असणार आहेत. पुरूष आणि स्त्री. मी पुरुषांना महिलांचे खेळ खेळण्यास बंदी घातली आहे. गेल्या ४३ दिवसांत आम्ही खूप काम केले आहे. एक निर्णय घेऊन आधीचे १०० बेकार निर्णय रद्द केले आहेत. आम्ही हास्यास्पद धोरणे रद्द केली आहेत. भ्रष्ट आरोग्य धोरणे देखील रद्द करण्यात आली आहेत, असे ट्रम्प यांनी सांगितले.