देशात रस्ते अपघातात वर्षभरात दोन लाख लोकांचा मृत्यू – प्रशांत देवणे

0

डोंबिवली : कोरोना काळात जीव वाचविण्यासाठी ज्याप्रमाणे काळजी घेतली जात होती त्या पद्धतीनेच रस्ता प्रवास करताना काळजी घेणे जरुरीचे आहे. निष्काळजीपणे रस्त्यावरून प्रवास केल्यामुळे देशात रस्ते अपघातात वर्षभरात सुमारे दोन लाख लोक दगावतात. ही संख्या फार मोठी असून अशा अपघातात दगवणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. देशाच्या भवितव्यासाठी तरुणांची फार मोठी गरज आहे. तरुण पिढीवर उद्याच्या देशाचे भविष्य अवलंबून आहे त्यामुळे रस्ता प्रवास करताना नियमांचे पालन करावे असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण तर्फे रस्ता सुरक्षा अभियान २०२५ कार्यक्रमात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मोटारवाहन निरीक्षक प्रशांत देवणे यांनी केले.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण तर्फे रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत रस्ता प्रवास करताना कोणती काळजी घ्यावी या विषयावर पश्चिम डोंबिवलीत पौर्णिमा सभागृहात शाळा व कॉलेज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तोंडवळकर विद्यावर्धिनी व जय गजानन मोटर ड्राइविंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक नियमन मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करण्यात आला. यावेळी कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयचे मोटारवाहन निरीक्षक प्रशांत देवणे, वाहतूक शाखा डोंबिवली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील, रिक्षा युनियन नेते अंकुश म्हात्रे, भिकाजी झाडे, गजानन जोशी, सुरेंद्र मासाळकर, समाजसेवक अनमोल म्हात्रे* इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान निरीक्षक प्रशांत दवणे यांनी रस्त्यावर अपघात होवू नयेत यासाठी कोणती काळजी घ्यावी, अपघातग्रस्तांचे प्राण कसे वाचवावे, फूटपाथवरून चालताना कोणती काळजी घ्यावी, विद्यार्थी जीवनात वाहन चालविणे का धोकादायक आहे अशा विस्तृत विषयांवर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमाला विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकवृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech