वॉशिंगटन : अमेरिकेतील अॅरिझोना याठिकाणी दोन लहान विमानांची हवेत जोरदार धडक झाल्याने मोठा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. टक्सनच्या बाहेरील एका लहान विमानतळावर हा अपघात झाला आहे.या दुर्घटनेत किमान दोन जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टक्सनच्या बाहेरील एका विमानतळावर बुधवारी(१९ फफेब्रुवारी )सकाळी हा अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाल्याचे माराणा पोलिसांनी सांगितले. सेस्ना 172S आणि लँकेअर 360 MK II या दोन विमानांमध्ये टक्कर झाली असून दोन्ही दोन्ही फिक्स्ड-विंग, सिंगल-इंजिन विमाने असल्याचे NTSB ने सांगितले. मृतांची ओळख अद्याप पटू शकली नाही.
या अपघाताचा तपास यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) कडून सुरू आहे.स्थानिक अधिकारी आणि तपासकर्त्यांचे एक पथक अपघात कसा झाला आणि तो मानवी चुकीमुळे झाला की तांत्रिक बिघाडामुळे झाला हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. अपघात झाला तेव्हा आकाश निरभ्र होते, त्यामुळे हवामानाशी संबंधित कोणतीही समस्या नसल्याचे मानले जात आहे. अलिकडच्या काळात अमेरिकेत चार मोठे विमान अपघात झाले आहेत. सर्वात अलीकडील घटना म्हणजे टोरंटोमध्ये लँडिंग करताना डेल्टा जेट उलटले. मात्र विमानातील सर्व ८० जणांना वाचवण्यात यश आले. याशिवाय अलास्कामध्ये विमान अपघात झाला. जानेवारीच्या अखेरीस, वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिकन एअरलाइन्सचे प्रवासी विमान आणि लष्करी हेलिकॉप्टर यांच्यातील टक्करमध्ये ६७ जणांचा मृत्यू झाला.