शहापूर : प्रफुल्ल शेवाळे
शहापूर तालुक्यातील कवडास ग्रामीण भागातील श्री.दिपक(नाना) घोडविंदे यांनी नोकरी सोबत फूल व्यवसाय करत आपल्या दोन्ही मुलींना स्पर्धा खेळाच्या वाटा मोकळ्या करून दिल्या आहेत.
दिपक यांच्या दोन मुली कु.शुभदा दिपक घोडविंदे आणि कु.तेजस्विनी दिपक घोडविंदे या दोघींनी अनोख्या क्रीडा क्षेत्रात नावलौकिक करून दाखविण्याचा विडा उचलला आहे. स्पर्धा खेळा मध्ये यशस्वी होण्याचे शिवधनुष्य आता या दोन्ही मुली सत्यात उतरवत आहे.
आई-वडिलांच्या मेहनतीला दोन्ही मुली पुरेपूर न्याय देत आहेत. दिपक घोडविंदे यांनी घरासमोरील मोगरा पिकावर नांगर चालवून न परवडणारा ४/५ लाख रुपये खर्चून टेनिस कोर्ट तयार केला. या ठिकाणी दोन्ही बहिणी आपल्या टेनिस खेळाचा सराव अगदी सातत्याने करीत आहेत.
मुंबई विभागातून खेळताना दोन्ही मुली Under-12 मध्ये आपला दबदबा अबाधित ठेवत मुलींच्या Under-12 मध्ये सर्वांना चारीमुंड्या चीत करून एकमेकांसमोर आल्या विजेतेपद,उपविजेतेपद दोन्ही आपल्याकडे ठेवून सर्वांना शहापूरचे पाणी पाजलं. परिस्थितीचा बाऊ न करता दोन्ही मुली ज्याप्रकारे खेळत आहेत त्यांच्या खेळातून महिला टेनिस मधील राज्याचे आणि पर्यायाने देशाचे भविष्य दिसून येत आहे.
आई वडिलांच्या दूरदृष्टीला,जिद्दीला आणि दोन्ही मुलींच्या मेहनतीला सलाम आहे अशी चर्चा शहापूर तालुक्यातील पंचक्रोशी मध्ये होताना दिसून येत आहे.