मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका करत दोन ठगांनी गुजरात आणि देशात फूट पाडल्याचा गंभीर आरोप केला. मुंबईतील शिवाजी नाट्यमंदिरात पार पडलेल्या राज्यव्यापी वज्र निर्धार परिषदेतील भाषणात ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी ठाकरे म्हणाले की, गुजराती आणि मराठी वाद कधीच नव्हता, आणि तो होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. परंतु, दोन गुजराती ठगांनी गुजरात आणि मुंबईत भिंत उभी केली आहे, असा आरोप केला. भाजपच्या विरोधात बोलताना त्यांनी विचारले की, शिवसेनेच्या कोणत्या भाषणात सर्व मुस्लिम शत्रू असल्याचे म्हटले आहे. या देशातील आणि महाराष्ट्रातील जनता आमचीच आहे; आम्ही जातपात पाहत नाही, असे ठाकरे म्हणाले. ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या राम मंदिर भूमिकेवरही टीका केली. त्यांनी विचारले, ते म्हणाले की, जिथे राम मंदिर बांधलं, तिथे घाईघाईत बांधून ते गळकं केलं, तुम्हाला राम का पावला नाही? त्यांनी पुढे विचारलं की, हे सर्व अदानी आणि लोढासाठी केलं. कारसेवकांना अपंगत्व येणे आणि पुजारी, कंत्राटदार गुजराती असण्याच्या मुद्द्यावर ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले.
ठाकरे यांनी भूमिपुत्रांना न्याय मिळावा, या विचाराला पाठिंबा देताना भाजपवर आरोप केला की, त्यांनी वापरा आणि फेकून द्या, ही धोरणे राबवली आहेत. त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या काळातील भाषणाचा उल्लेख केला. त्यात जातीय तणाव निर्माण न करता हिंदुत्वाचा सकारात्मक अर्थ सांगितला जात असे. नवीन महाराष्ट्र घडवण्याची गरज नाही; आमच्या महाराष्ट्राचे स्वत्व टिकवायला हवे, असे म्हणत ठाकरे यांनी राज्याची ओळख आणि संस्कृती जपण्याचे आवाहन केले. कोणतंही क्षेत्र घ्या, महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा पुढे आहे; मग या दोन ठगांची गुलामगिरी का स्वीकारायची? असा सवाल उपस्थित करत त्यांनी जनता मोदी-शाह यांचे खरे रंग ओळखून योग्य निर्णय घेईल, असा विश्वास व्यक्त केला.