राज ठाकरेंच्या सादाला उद्धव ठाकरेंचा अटी-शर्तीसह सकारात्मक प्रतिसाद

0

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे बंधू तथा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्यासाठी साद घातली होती. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, आमच्यातील भांडणं मिटवून टाकली, पण कोणासोबत जायचं हे पहिले ठरवा. कोणासोबत जाऊन मराठीचं हित होणार आहे हे ठरवा, मग काय द्यायचा तो पाठिंबा, विरोध बिनशर्त करा, माझी काही हरकत नाही. फक्त महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी. पण बाकीच्यांना, या चोरांना गाठीभेटी, कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही, ही शपथ घ्यायची आणि मग टाळी देण्याची हमी द्यायची, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहाणं, यात काही मला कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही. मला असं वाटतं, लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे. तसेच सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा, असं आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.

यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे, माझं सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचं आवाहन आहे.. पण एक अट आहे, जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो, हे सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचं सरकार केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो. तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही चालणार. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी मी बोलावणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, त्याचं आगत स्वागत करणार नाही, हे पहिलं ठरवा, मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी भांडणं माझ्याकडून नव्हतीच, ती मी मिटवून टाकली चला, पण पहिलं हे ठरवा.

आंधळेपणाने भरकटत जायचं म्हणजे आम्ही हिंदू असं होत नाही. हिंदी बोललं म्हणजे हिंदू आहोत, गुजराती बोललं म्हणजे आम्ही हिंदू आहोत… अजिबात नाही. आम्ही मराठी बोलणारे कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. पण लोकांमध्ये भांडणं लावायचं, वक्फ बोर्डावरुन, भाषेच्या सक्तीवरुन लोकांमध्ये भांडण लावायची आणि अशी बिल मंजूर करुन घ्यायची. यांचं मिशन हेच आहे, की कोणी एकत्र येता कामा नये. संघटित व्हायचं नाही, विस्कळित ठेवायचं, सतत दबावाखाली ठेवायचं.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मराठी माणसाचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे…प्रत्येक कामगाराचा शाखेसोबत समन्वय झालाच पाहिजे…खूप जणांना काही देता नाही आला तरीसुद्धा ते हिंदुत्वासाठी आणि पक्षासाठी माझ्यासोबत राहिले…आज सुद्धा कायदे आणलेत कामगारांचे त्याला विरोध केलाच पाहिजे…पण निवडणुकीच्या वेळेला आपण विस्कळीत असतो. आम्ही महाराष्ट्राचे मराठी कडवट आहोत. शेतकऱ्यांचे कार्य कायदे आले तेव्हा शेतकरी रस्त्यावर उतरला तसा कामगार रस्त्यावर उतरला नाही…त्यांचा मिशन हेच आहे की कोणी एकत्र आला नाही पाहिजे. आपल्याला भांडणात गुंतवून ठेवून यांचे काय चाळे चालले आहेत ते पाहा…मुंबईत सुद्धा काही गोष्टी अदानीच्या कशात घालायच्या. आणि तुम्ही त्यावर बोलू नये म्हणून तुम्हाला भांडणात व्यस्त ठेवायचं…आता काय दुर्दैवाने सरकार आलं आहे ते आता जाहीरनाम्यावर काहीच कोणीच बोलत नाही. तुम्ही मारलेला थापा ऐकून मतदान केलं असं आपण एक वेळ म्हणू…पण त्यावर आता कोणीच बोलत नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech