किरण पावसकर यांचा खळबळजनक दावा….!
मुंबई – अनंत नलावडे
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे दिले गेले. मात्र विमानतळाजवळील महाराजांचा अश्वारुढ पुतळा हटवण्यास बाळासाहेबांचाही विरोध असताना देखील उद्धव ठाकरे यांनी ‘जीव्हीके’ कंपनीशी डील केली आणि महाराजांचा पुतळा हटवून उबाठाने महाराष्ट्राच्या अस्मितेची केवळ कमिशनसाठी तडजोड केली,असा खळबळजनक दावा शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर यांनी सोमवारी बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केला.
मुंबई विमानतळाचे विस्तारीकरण करण्यासाठी जीव्हीके कंपनीने सहार पोलिस स्टेशन आणि महाराजांचा अश्वारुढ पुतळा हलवण्याचा प्रस्ताव दिला होता.मात्र याला बाळासाहेबांनी पहिला विरोध केला होता. याविषयी कंपनीशी देणंघेणं करण्यासाठी उद्धव ठाकरे गेले होते.छत्रपतींच्या नावाने तुम्ही किंमत विचारायला गेला होतात आणि ती किंमत तुम्ही घेतलीत,असा थेट आरोपही पावसकर यांनी यावेळी केला.
मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत झालेला प्रकार दुर्देवीच असून या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली असतानाही त्यावर उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून सुरु असलेले राजकारण निंदनीयच असून स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांच्याकडे माफी मागण्याची हिंमत यांनी का दाखवली नाही.भारत जोडो यात्रा काढणाऱ्यांना सावकरांचा अपमान केल्यावर गेट आऊट करण्याची धमक उद्धव ठाकरे यांनी का दाखवली नाही, असा खरमरीत सवालही पावसकर यांनी केला.तरं आता छत्रपतींच्या नावाने राजकारण करणारेच आज गळा काढत आहेत, असाही थेट आरोप पावसकर यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केला.
ते पुढे म्हणाले की,लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी यांचेच प्रवक्ते महाराष्ट्रात दंगली उसळणार असे वारंवार सांगत होते.मात्र सरकारने असा कुठलाही प्रकार होऊ दिला नाही.परंतु आता पुन्हा ठाकरे गटाचा खरा चेहरा समोर आल्याचे सांगत,यांच्याच गटाचे नेते व माजी खा.चंद्रकांत खैरे यांनी पुतळा दुर्घटनेनंतर राज्यात दंगली घडाव्यात, असे वादग्रस्त वक्तव्य केलेले असून या वक्तव्यावरुन ठाकरे गटाला महाराष्ट्रात दंगली घडवायच्या होत्या का,असा प्रश्न उभा राहतो.त्यामुळे खैरे यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आग्रही मागणीही पावसकर यांनी केली.
शिवचरित्राचे अभ्यासक दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र लोकांपर्यंत पोहचावे म्हणून आयुष्य वेचले मात्र त्यांची बदनामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केली.याच पुरंदरेंचा मानसिक छळ केला.आणि आता त्यांचेच नेते खा.शरद पवार ४० वर्षांनंतर रायगडावर जाऊन आले. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ थेट महिलांच्या खात्यात जमा होणार असून यात कोणत्याही दलालांना पैसे मिळणार नाही.त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.त्यामुळे ही योजना कशी बंद होईल,यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत,असाही आरोप पावसकर यांनी केला.