नाशिक : शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अनेक आजार झाले आहेत. सध्या ते चिडलेले आणि घाबरलेले आहेत. त्यामुळे सध्या त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना चोरांचे सरदार असे उल्लेखत टीका केली होती. यावर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी त्यांच्यावर पलटवार केला. ते म्हणाले की, चोरांचे सरदार कोण आहेत? हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई महापालिकेची लूट केली आहे, असे आरोप केले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नाशिकमध्ये आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी ते म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचा विकास करत आहेत. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई लुटली. महाविकास आघाडीचे नेते सध्या हरलेल्या मन:स्थितीमध्ये आहेत. आणि माणूस जेव्हा हरतो, तेव्हा तो अशी काही विधाने करतो.” असा टोला त्यांनी लगावला. सध्या शरद पवरांना बारामतीमध्ये गल्लोगल्ली फिरावे लागले. म्हणजेच त्यांना पराभवाची चाहूल आहे, असा दावा यावेळी बावनकुळे यांनी केला.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले नसते आणि ते काँग्रेससोबत गेले नसते, तर त्यांना नैराश्य आले नसते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित नव्हती ती चूक उद्धव ठाकरेंनी केली. त्यांना एका विशिष्ट समाजाची मते हवी आहेत, त्यामुळे भगव्या ध्वजाला ठाकरे आता फडके म्हणतात. मताच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे आपल्या उंचीपेक्षा जास्त बोलत आहेत,” अशी टीका केली. तसेच, राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काही मागण्या केल्या असून त्यांच्या मागण्या पंतप्रधान मोदी नक्कीच पूर्ण करतील, असा दावा त्यांनी केला.