नवी दिल्ली – नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) १८ जून २०२४ रोजी घेण्यात आलेली यूजीसी-नेट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परीक्षा झाल्यानंतर दुस-याच दिवशी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन अर्थात यूजीसीला केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या नॅशनल सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरकडून परीक्षे संदर्भात काही गंभीर इनपूट मिळाले होते. त्यानंतर शिक्षण मंत्रालयाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
एटीएकडून काल म्हणजे मंगळवारी यूजीसी-नेट परीक्षा देशातील विविध शहरांमध्ये दोन टप्प्यात घेण्यात आली होती. ही परीक्षा ओएमआर मोडमध्ये झाली. मात्र, १४ सीकडून दिलेल्या माहितीत या परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत तडजोड झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळेच शिक्षण मंत्रालयाने परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता कायम राखण्यासाठी यूजीसी-नेट जून २०२४ ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
याआधी नीट परीक्षेच्या ग्रेस गुणांवरून झालेल्या गोंधळ पूर्णपणे मिटवण्यात आला आहे. तसेच पाटणा येथील परीक्षा केंद्रावर झालेल्या अनियमिततेबद्दल बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला. संबंधित अहवाल मिळाल्यानंतर त्यावर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले. परीक्षांचे पावित्र्य आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार कोणतीही तडजोड करणार नाही. या प्रकरणात कोणतीही संस्था अथवा व्यक्तीचा सहभाग असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.
सीबीआयमार्फत तपास
नीटच्या परीक्षेत झालेल्या गोंधळानंतर केंद्र सरकारने सावध पवित्रा घेत मंगळवार, दि. १८ जून रोजी झालेली यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप झाल्यानंतर शिक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. त्यामुळे जून सत्रात झालेली परीक्षा आता पुन्हा घेण्यात येणार आहे. शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार यूजीसी-नेटची नव्याने परीक्षा नव्याने घेण्यात येणार आहे.