उज्ज्वल निकम यांची पुन्हा विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती

0

मुंबई – लोकसभा निवडणुकीत भाजपचे उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार राहिलेल्या उज्ज्वल निकम यांना पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्यांदाच राजकीय मैदानात उतरलेल्या निकम यांना पहिल्याच निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. मात्र, भाजपकडून पराभव पचवल्यानंतरही उज्ज्वल निकम यांना सरकारने नव्याने बक्षीस दिले आहे. उज्ज्वल निकम यांची पुन्हा एकदा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, यापूर्वी निकम यांच्याकडे असलेल्या सर्व खटल्यांचे कामकाज ते पुन्हा सुरू करणार आहेत. मात्र, काँग्रेसने उज्ज्वल निकम यांच्या फेरनियुक्तीला विरोध केला असून नाना पटोले यांनी ट्विट करुन सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा आहेत. त्यापैकी पाच जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. मुंबईत यंदा अत्यंत चुरशीची लढत ठरली ती उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात. कारण, भाजपने देशभक्त म्हणत या मतदारसंघातून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे, काँग्रसेच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम यांच्यात रोमहर्षक लढत झाली. मात्र, या लढतीत उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आहे. पण, पराभवानंतर अवघ्या १२ दिवसांतच सरकारने त्यांनी पुन्हा राज्याच्या विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती केली आहे. राज्य सरकारने उज्ज्वल निकम यांची फेरनियुक्ती केल्यामुळे आता विरोधकांनी या नियुक्तीला आक्षेप घेतला आहे. तसेच, भाजप उमदेवाराला सरकारी वकील करता येणार नाही, अशी भूमिकाही काँग्रेसने घेतली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech