नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन ८ ते १३ एप्रिल दरम्यान युनायटेड किंग्डम आणि ऑस्ट्रियाच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना होत आहेत. सीतारामन दोन्ही देशांमध्ये मंत्रीस्तरीय द्विपक्षीय बैठकांना उपस्थित राहणार आहेत. या भेटीदरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री भारत-यूके आर्थिक आणि अर्थपुरवठाविषयक संवादाच्या १३ व्या मंत्रीस्तरीय फेरीत सहभागी होतील आणि युनायटेड किंग्डम आणि ऑस्ट्रियामधील थिंक टँक, गुंतवणूकदार, व्यावसायिक नेत्यांशी संवाद साधतील. भारत-यूके आर्थिक आणि अर्थपुरवठा विषयक संवादाची १३ वी मंत्रीस्तरीय फेरी (१३ वी ईएफडी) युनायटेड किंग्डममध्ये लंडन येथे, ९ एप्रिल रोजी होणार आहे. १३ वा ईएफडी संवादाचे केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री आणि यूकेचे चॅन्सेलर ऑफ द एक्सचेकर सहअध्यक्षपद भूषवतील.
१३ वा ईएफडी हा दोन्ही देशांमधील एक महत्त्वाचा द्विपक्षीय मंच आहे जो गुंतवणूक बाबी, वित्तीय सेवा, वित्तीय नियम, यूपीआय इंटरलिंकेज, कर आकारणी बाबी आणि बेकायदेशीर आर्थिक प्रवाह यासह अर्थपुरवठाविषयक सहकार्याच्या विविध पैलूंमध्ये मंत्री स्तरावर, अधिकारी स्तरावर, कार्य गटांमध्ये आणि संबंधित नियामक संस्थांमध्ये व्यापक सहभागासाठी संधी उपलब्ध करतो. आयएफएससी गिफ्ट सिटीमध्ये सहकार्यासह, गुंतवणूक, विमा आणि निवृत्तीवेतन क्षेत्र, फिनटेक आणि डिजिटल अर्थव्यवस्था आणि परवडण्याजोगे आणि शाश्वत हवामान अर्थसाहाय्य मिळवणे हे या १३ व्या ईएफडीचे प्राधान्याचे विषय आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री आणि यूकेचे चॅन्सेलर ऑफ द एक्सचेकर विविध अहवालांचे प्रकाशन करतील आणि भविष्यातील अधिक जास्त सहकार्यासाठी नव्या उपक्रमांची घोषणा करतील. भारत-यूके १३ व्या ईएफडीच्या निमित्ताने, सीतारामन प्रमुख मान्यवरांसोबत द्विपक्षीय बैठका घेतील, गुंतवणूकदार गोलमेज बैठकांमध्ये आणि प्रमुख वित्तीय संस्था आणि कंपन्यांच्या प्रमुखांसोबत इतर बैठकांमध्ये सहभागी होतील.
अधिकृत दौऱ्यादरम्यान, युनायटेड किंग्डमच्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भारत-युके गुंतवणूकदार गोलमेज परिषदेत बीजभाषण करतील, ज्यामध्ये पेन्शन फंड, विमा कंपन्या, बँका आणि वित्तीय सेवा संस्थांसह इतर यूके वित्तीय परिसंस्थेमध्ये कार्यरत असलेले प्रमुख व्यवस्थापन कर्मचारी सहभागी होतील. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि ब्रिटनचे व्यवसाय आणि व्यापार मंत्री जोनाथन रेनॉल्ड्स हे लंडन सिटीच्या भागीदारीने आयोजित या गोलमेज परिषदेचे सह-यजमानपद भूषवतील, ज्यामध्ये ब्रिटनमधील प्रमुख पेन्शन फंड आणि मालमत्ता व्यवस्थापकांचे अग्रणी सीईओ आणि वरिष्ठ व्यवस्थापन सहभागी होईल.
या अधिकृत दौऱ्यात, ऑस्ट्रियाच्या टप्प्यादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री ऑस्ट्रियाच्या वरिष्ठ सरकारी नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतील, ज्यामध्ये ऑस्ट्रियाचे अर्थमंत्री मार्कस मार्टरबॉर आणि ऑस्ट्रियाचे फेडरल चांसलर महामहीम ख्रिश्चन स्टॉकर यांचा सहभाग असेल. निर्मला सीतारामन आणि ऑस्ट्रियाचे अर्थव्यवस्था, ऊर्जा आणि पर्यटन मंत्री वुल्फगँग हॅटमॅन्सडॉर्फर हे दोन्ही देशांमधील सखोल गुंतवणूक सहकार्यासाठी भारतातील विद्यमान आणि आगामी संधींबद्दल माहिती देण्यासाठी प्रमुख ऑस्ट्रियन सीईओंसोबत एका सत्राचे सह-अध्यक्षपद भूषवतील.