कल्याणच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांना दिले निवेदन
कल्याण : कल्याण पूर्वेच्या कचोरे गावातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालसंस्कार केंद्रावर काही दिवसांपूर्वी समाजकंटकांकडून दगडफेक केल्याची घटना घडली होती. याचे कल्याण डोंबिवलीमध्ये तीव्र पडसाद उमटत असून या घटनेमागील मुख्य सूत्रधाराचा तातडीने शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. यासंदर्भात पवार यांनी आज कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे यांची भेट घेत निवेदन दिले.
कल्याण पूर्वेच्या कचोरे गावातील चौधरी वाड्यातील मोकळ्या जागेमध्ये दररोज सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालसंस्कार वर्ग भरवण्यात येतो. यामध्ये स्थानिक परिसरातील ८ ते १५ वयोगटातील मुलांना मर्दानी खेळ, राष्ट्रभक्ती आणि बाल संस्काराचे धडे शिकवले जातात. मात्र गेल्या आठवड्यात ९ मार्च रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास या बालसंस्कार केंद्रावर न्यू गोविंदवाडी बीएसयूपी इमारतीच्या दिशेने सिमेंट काँक्रीटचे तुकडे असणारे दगड भिरकावण्यात आल्याचे सांगत हा अत्यंत निषेधार्ह प्रकार असल्याचे नरेंद्र पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान या दगडफेकीच्या प्रकारावरून त्यामागे नक्कीच कोणीतरी मास्टर माईंड असल्याचा संशय माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच यामागचे खरे सूत्रधार कोण आहेत याचा लवकरात लवकर छडा लावून तातडीने कारवाई करण्याची आग्रही मागणीही नरेंद्र पवार यांनी पोलिसांकडे केली आहे.
यावेळी कल्याण विकास फाऊंडेशन अध्यक्षा हेमलता नरेंद्र पवार, माजी आमदार नरेंद्र पवार, संजीवनी पाटील, डॉ. सुनिल हरपाळे, समृद्धी देशपांडे, सुनिल शेट्टी, अनिल लांडगे, अतुल प्रजापती, मकरंद ताम्हणे,विकास पाटील, काका गवळी, सचिन गायकर, संजय शेलार, विवेक गायकर, भरत पाटील, रोहित लांबतुरे, मयूर जाधव, माँटी कारभारी उपस्थित होते.