वॉशिंगटन : युनायटेड स्टेट्सच्या बाहेर तयार झालेल्या सर्व वाहनांवर २५ टक्के शुल्क लागू केले जाणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.याशिवाय हा दरवाढीचा निर्णय कायम असल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. हे नवीन आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय २ एप्रिलपासून लागू होणार असून ३ एप्रिलपासून त्याची वसुली सुरू होणार आहे. अमेरिकेत आयात होणाऱ्या सगळ्या गाड्यांवर भरमसाठ आयात शुल्क लावण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. ‘आम्ही अमेरिकेत तयार नसलेल्या सर्व कारवर २५ टक्के शुल्क लावणार आहोत. या धोरणामुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळणार असून कार अमेरिकेत बनवल्यास त्यावर कोणतेही शुल्क लागणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये एका कार्यक्रमादरम्यान म्हटलं. हे नवीन टॅरिफ धोरण केवळ परदेशात उत्पादित केलेल्या कारला लागू होणार नाही, तर हलक्या वजनाच्या ट्रकवरही परिणाम होणार आहे. हे टॅरिफ धोरण सध्याच्या दराच्या व्यतिरिक्त लागू केले जाईल. सध्या, यूएस इंटरनॅशनल ट्रेड कमिशन नुसार, बहुतेक देशांमधून येणाऱ्या प्रवासी गाड्यांवर २.५ टक्के दर लागू होते. १९९० पासून ट्रकवर चिकन टॅक्स म्हणून ओळखला जाणारा २५ टक्के दर लागू आहे.
दरम्यान या निर्णयामुळे वाहन उत्पादकांची पुरवठा साखळी विस्कळीत होऊन अमेरिकन ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. ट्रम्प प्रशासन व्यापार असमतोल कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी काम करत असतानाच ही घोषणा करण्यात आली आहे. मात्र या टॅरिफमुळे अमेरिकासोबत जागतिक व्यापार संबंधांमध्ये तणाव वाढू शकतो.ट्रम्प यांच्या निर्णयामुळे गाड्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि देशांमध्ये चितेंचे वातावरण निर्माण झालं आहे.