पाचशे कोटींचा भूखंड स्वत:च्या खासगी ट्रस्टच्या माध्यमातून हडप?

0

‘भूखंडावर ताव मारा आणि तृप्त व्हा’ महायुतीची लाडक्या मंत्र्यांसाठी योजना, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

मुंबई – महायुतीच्या मंत्र्यांनी सरकारी तिजोरीतील पैसे फस्त केले आहेत. त्यामुळे आता ‘भूखंडावर ताव मारा आणि तृप्त व्हा’ अशी नवी योजनाच या सरकारने लाडक्या मंत्र्यांसाठी आणली आहे. या योजनेचे लाभार्थी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आहेत. गोर बंजारा समाजासाठी नवी मुंबईतील बेलापूर येथे दीड एकर भूखंड मिळाला होता. हा पाचशे कोटींचा भूखंड स्वत:च्या खासगी ट्रस्टच्या माध्यमातून हडप करण्याचा पराक्रम संजय राठोड यांनी केला असून गोर बंजारा समाजाची त्यांनी फसवणूक केली आहे. तसेच सध्या मंत्रीमंडळात असणाऱ्या बिल्डर मंत्र्यांनी देखील सातशे कोटींचा भूखंड जैन इंटरनॅशनल आर्गनायझेशनच्या नावाखाली हडप केला आहे. कुलाबा महसूल विभागातील हा मोक्याचा भूखंड खाणारा बिल्डरमंत्री सरकारचा लाडका आहे. कागद पत्रांची हेराफेरी करून भूखंड खाण्याचा उद्योग या हेराफेरी सरकारने सुरू केला असल्याचा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. त्याचबरोबर नागपूर येथील हिट अँड रन प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या लाडक्या मुलावर कारवाई करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

मुंबईतील प्रचितगड या शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारमधील भ्रष्टाचार, कागपत्रांची हेराफरी समोर आणली. वडेट्टीवार म्हणाले की, मंत्री राठोड यांना भूखंड देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकार कक्षेच्या बाहेर जावून मदत केली आहे. मंत्री राठोड यांच्या खासगी सचिवांच्या पत्रावर कारवाई करून हा भूखंड दिला आहे. यासाठी विहित पद्धतीचा अवलंब केलेला नाही. कोणतीही कायदेशीर प्रक्रीया राबविलेली नाही. बेकायदेशीर पत्रावर निर्णय घेऊन हा भूखंड दिला आहे. गोर बंजार समाजाची यामध्ये फसवणूक झाली आहे. भ्रष्टाचार उघडकीस आल्यावर मंत्री राठोड भूखंड परत करण्याची भाषा बोलत आहेत. परंतु आता वेळ निघून गेली आहे. त्यांचा इरादा समाजाच्या लक्षात आला आहे. राठोड मंत्री म्हणून देखील बेकायदेशीर काम केले आहे. 2200 कोटी बजेट असताना 8000 कोटींची टेंडर काढली आहेत.

वडेट्टीवार म्हणाले की, सरकारमधील बिल्डरमंत्र्याने कहरच केला आहे. जैन इंटरनॅशनल आर्गनायझेशन या खासगी शिक्षण संस्थेच्या नावाखाली 700 कोटींचा कुलाबा महसूल विभागातील भूखंड हडप केला आहे. याची सगळी प्रक्रीया पूर्ण झाली आहे. परंतु हा भ्रष्टाचार उघडकीस येईल या भीतीमुळे अजून शासन निर्णय निर्गमित केला नाही. सरकारने अशी चलाखी जरी केली असली तरी हे प्रकरण उजेडात आले आहे.

नागपूर येथील हिट अँन्ड रन प्रकरणाची सरकारने चौकशी करून भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या लाडक्या मुलावर कारवाई करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. पुण्यातील पोर्शे कार प्रकरणात अजितदादा गटाच्या नेत्याने आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला. वरळी येथील अशाच प्रकरणात शिंदे गटाच्या नेत्याने आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला. आता तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलीस आरोपींना पाठिशी घालत आहेत. नंबर प्लेट काढून, सीसीटीव्ही नष्ट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech