सोलापूर : सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघात मुस्लिम समाजातील काही मतदारांनी जाब विचारला. “तुम्ही खासदार झाल्यानंतर सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजातील काँग्रेस नेत्याला उमेदवारी द्यायला पाहिजे होती”. नाराज झालेल्या मतदारांची समजूत काढण्याचा प्रणिती शिंदें यांनी प्रयत्न केला. प्रणिती शिंदे आणि मतदार यांची झालेली शाब्दिक चकमक मोबाईलच्या कॅमेरात कैद झाली असून याची सोशल मीडियावर चर्चा आहे. अखेर प्रणिती शिंदेंनी सडेतोड उत्तर देत त्यांचं वाहन पुढे घेऊन गेल्या. ते अकरा पैकी एकही उमेदवार दोन टक्के मतदान घेऊ शकला नसता, असे सणसणीत उत्तर देत प्रणिती शिंदें पुढे गेल्या.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात पंधरा वर्षे आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदें यांना सोलापूर शहरात मुस्लिम समाजातील मतदारांनी जाब विचारला. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या मोठ्या संख्येने आहे. सोलापुरातील मुस्लिम जनतेने लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदेंना भरभरून मतदान केले आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून काँग्रेसमधील आणि महाविकास आघाडीतील अकरा मुस्लिम नेत्यांनी एकत्रित येत, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाला विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती.