कर्जत : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित व शिफारशीत केलेले सर्व तंत्रज्ञान उत्तर कोकणच्या शेतकऱ्यांपर्यंत परिणामकारकरीत्या पोहचण्यासाठी येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे उद्घाटन कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते झाले. यावेळी भारतीय कृषी अनुसंधान परिषद,नवी दिल्लीचे माजी सहायक महासंचालक डॉ.नारायण जांभळे, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण व संशोधन संचालक डॉ.पराग हळदणकर, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर,विद्यापीठाच्या विस्तार परिषदेचे सदस्य विलास म्हात्रे, सहयोगी संशोधन संचालक डॉ.भरत वाघमोडे, विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ.रवींद्र मर्दाने, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. रमेश कुणकेरकर ,जैवतंत्रज्ञान प्रभारी अधिकारी डॉ. एस. व्ही. सावर्डेकर ,वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. पुष्पा पाटील,शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ. मीनाक्षी केळुसकर,कीटकशास्त्रज्ञ डॉ. वैशाली सावंत, प्रमुख कृषिविद्यावेत्ता डॉ. विजय सागवेकर,उपसंचालक डॉ क्षीरसागर,प्रमुख कृषिविद्यावेत्ता डॉ. विजय सागवेकर, कृषी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय तोरणे,कृषिविद्या विभागप्रमुख डॉ.एम. जे. माने, सहा.भात विशेषज्ञ डॉ. महेंद्र गवई,खार जमीन शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण वणवे,वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. हरिप्रसाद,मृदा शास्त्रज्ञ डॉ. देवदत्त जोंधळे प्रामुख्याने उपस्थित होते.
या माहिती केंद्रात विद्यापीठ निर्मित विविध भात वाण नमुने, कृषी औजारे, कृषी प्रकाशने ठेवण्यात आले असून भाताच्या विविध लागवड पद्धतींची छायाचित्रांसह अभ्यासपूर्ण माहिती,विविध कीड व रोगांचे माहितीपूर्ण तक्ते, विविध पिकांवरील ऍप्स,युट्युब द्वारे तसेच दूरदर्शनद्वारे बघता येणारी चलचित्रे आहेत. याठिकाणी शेतकऱ्यांना व शेतीविषयक जिज्ञासा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला इत्यंभूत माहिती मिळणार आहे.प्रत्येकाला क्षणार्धात विविध ऍप्स भ्रमणध्वनीवर डाऊनलोड करता येतील.त्यामुळे कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होणार आहे. ज्ञान, क्रयशक्ती व राहणीमान उंचावण्यासाठी नवतंत्रज्ञांचा उपयोग होणार असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी केले आहे.