- आ. प्रविण दरेकरांचे शिर्डीवासियांना आवाहन
- केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे, कवितेतून विरोधकांवर टिकास्त्र
लोणी- राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर जिल्ह्याचा विकास केला हे कुणीच नाकारू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनंतर सगळ्यात महत्वाचे महसूल खाते विखे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यात काम करत होते. हे खाते आपला नेता भूषवतोय त्यांना साजेसा विजय देण्याचे काम तुम्हाला करायचे आहे. विखेंचा विजय राज्यातील प्रथम क्रमांकाचा विजय असला पाहिजे. लाखाचे मताधिक्य विखे पाटलांना मिळवून द्या, असे आवाहन भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी शिर्डीवासियांना केले.
शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचाराची सांगता सभा आज लोणी येथे पार पडली. या सभेला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह भाजपा, राष्ट्रवादी आणि आरपीआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जनसमुदायाला संबोधित करताना आ. दरेकर म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने निर्धार केलाय पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणायचे. लोकसभेत नरेंद्र मोदींना जनतेने पुन्हा पंतप्रधान केले. परंतु जे यश मिळायला हवे होते ते दुर्दैवाने मिळाले नाही ही खंत आहे. देशाची ११ वी असलेली अर्थव्यवस्था ५ व्या स्थानी आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. आज चित्र आपल्या बाजूने आहे. उद्धव ठाकरेंची कारकीर्द मुख्यमंत्री म्हणून पाहिली. गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकासकामांना स्थगिती देण्याचे काम केले. परंतु महायुतीचे सरकार आल्यावर विकासाला गती मिळाली, असेही दरेकर म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अनपेक्षित यशाने महाविकास आघाडीचे नेते नाचत होते. परंतु मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आली आणि सर्वच चित्र बदलून टाकले. विरोधक विचारायचे या योजनेला पैसे कुठून आणणार. परंतु तुम्ही सरकारमध्ये आल्यावर पैशाचा पाऊस पाडणार आहात का? महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना ठरवले आहे योजनेला नख लावणाऱ्या महाविकास आघाडीला मत देणार नाही.
दरेकर पुढे म्हणाले की, दुग्ध विकास मंत्री असताना दुधाला अनुदान देण्याचे काम विखे पाटील यांनी केले. या मतदार संघात जवळपास ८८,४४८ महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय. माझी बहिणींना विनंती आहे तुमचे तर मत मिळाले पाहिजे, तुमच्या नवऱ्याचे मत मिळाले पाहिजे आणि आपल्या मुलांचीही मतं विखे पाटील यांना मिळाली पाहिजेत या जाणीवेतून आपण सर्वांनी मतदान करा. विखे पाटील यांचा विजय महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा विजय असला पाहिजे. कारण त्यांच्यासारखा अनुभवी नेता, ज्याने अनेक वर्ष सरकारमध्ये काम केले, सरकारमध्ये काम करत असताना बांधावरच्या शेतकऱ्यालाही आपल्यातला माणूस वाटतो असा सर्वसामान्यातील नेता आहे त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याची जबाबदारी आपली आहे.
शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली हे सरकार महाराष्ट्राचे भविष्य बदलणार आहे. त्यामुळे ही निवडणूक कोण आमदार, मंत्री होतोय यापेक्षा महाराष्ट्राचे भविष्य कोण घडविणार आहे ही ठरविणारी आहे. ४०-४५ वर्ष आपण त्यांना सत्ता दिली आम्ही दोन वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राला गतिकडे नेले. पुन्हा एकदा पाच वर्ष आमच्या महायुतीच्या हातात सत्ता द्या महाराष्ट्राचे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही आणि त्यात विखे पाटील यांचा सिंहाचा वाटा असेल, असा विश्वासही दरेकरांनी बोलताना व्यक्त केला.
तर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कवितेने केली. ते म्हणाले की, बाळासाहेब विखे पाटील यांचे गावं आहे लोणी, त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांना हरवू शकत नाही कोणी. यांनीच दिलेले आहे तुम्हाला पाणी, म्हणूनच आम्ही गात आहोत शिवरायांची, भीमरावांची गाणी. या मतदार संघाकडे माझी नजर आहे करडी, कारण राधाकृष्ण विखे पाटील जिंकणार आहेत शिर्डी.
शरद पवार मला म्हणाले होते आमच्याकडे या तुम्हाला मंत्रीपद देतो. पण मला माहित होते यांचे सरकार टिकणार नाही. शरद पवारांना पंतप्रधान बनण्याची संधी होती पण त्यांना सोनिया गांधींनी पंतप्रधान होऊ दिले नाही. तरीही पवार तिकडे गेले. कितीही प्रचार करा संविधान कुणीच बदलू शकत नाही. आपले सरकार आल्यावर बहिणींना २१०० रूपये मिळणार आहेत. ही योजना अत्यंत चांगली आहे. सरकारने चांगले काम केलेय, असेही आठवले म्हणाले.
अखेरीस बोलताना आठवले यांनी कवितेतून विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, विरोधकांचे आपल्याला वाजवायचेत बारा, म्हणूनच इथे जमलाय समुदाय सारा, शिवराय आणि भीमराव या देशात आहेत चमकणारा तारा, म्हणून या निवडणुकीत आम्ही वाजवणार आहोत महाविकास आघाडीचे बारा.
तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी, मला तुम्ही सात वेळा विधानसभेत निवडून पाठवले. ही पुण्याई पद्मश्री खासदारांची आहे, तुमची आहे. यामुळेच मला आत्मविश्वास, ऊर्जा मिळत आलीय. तुमचे उपकार या जन्मी मी फेडू शकणार नाही. तुमच्या विकासासाठी शेवटपर्यंत काम करत राहीन. म्हणून एक नंबरचे बटण दाबून मला आठव्यांदा आशीर्वाद द्या. पुन्हा एकदा त्याच ताकदीने तरुण, शेतकरी, सामान्य जनतेसाठी समाजातील प्रत्येक घटकासाठी मला काम करण्याची संधी द्या, असे आवाहन केले.
…निवडणुकीत मविआची लावणार वाट : या मतदारसंघात विखे पाटील ७ वेळा निवडणूक लढविली आहे. यंदा ते आठव्यांदा निवडणूक लढवत आहेत. म्हणजे तुमच्यासाठी खूप आहे आकडा आठ, आमचा आरपीआय कार्यकर्ता सोडणार नाही तुमची पाठ. आता महायुतीची आहे महाविकास आघाडीशी गाठ. या निवडणुकीत आम्ही कशी लावतो बघा महाविकास आघाडीची वाट, अशी कविता करत आठवले यांनी विरोधकांना चिमटा काढला.