ठाणे : 141-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील भरारी पथक क्र.3 व 6 मधील उल्हासनगर महानगरपालिकेचे कर्मचारी लिपिक, संकेत चनपूर, संदीप शिरसवाल व मुकादम, आण्णासाहेब बोरूडे तसेच या पथकातील पोलीस कर्मचारी पोलीस हवालदार विश्वनाथ ठाकूर आणि पोलीस नाईक राजरत्न बुकटे यांच्यावर निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याद्वारे दि.08 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर तातडीने निलंबनाचीही कारवाई करण्यात आली आहे.
बबन आमले, रा.भांडूप (पश्चिम) हे दि. 18 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटेच्या सुमारास म्हारळ नाका, उल्हासनगर नं.1 या ठिकाणाहून त्यांचे मित्र नितीन शिंदे यांच्यासह त्यांच्या इर्टिगा कार मधून अहमदनगर व पुणे जिल्हयातील फूल उत्पादक शेतकऱ्याकडील फूल मालाची विक्री करून त्या मालाचे पैसे त्यांना घरपोच देण्यासाठी रोख स्वरूपात रक्कम रू.7 लाख 50 हजार घेवून जात असताना भरारी पथकाचे प्रमुख संदीप शिरसवाल व संकेत चनपूर यांनी आमले यांच्याकडील पैशाबाबत “तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, पैसे जप्त करून ते परत मिळणार नाही” अशी भिती घालून या रक्कमेपैकी रक्कम रू.85 हजार काढून घेतले.
ही घटना दि. 18 ऑक्टोबर 2024 रोजी घडल्यानंतर संबंधित व्यक्तीने पोलीस उप-आयुक्त यांच्याकडे दि.19 ऑक्टोबर 2024 रोजी तक्रार दाखल केली होती. या घटनेचे गांभीर्य पाहता याबाबत पोलीस विभागाने अधिक तपास करून संपूर्ण घटनेचा अहवाल 141-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे सादर केला. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-4 यांनी याबाबत तपास करून व संबंधितांचे जाबजबाब नोंदवून घेवून दि. 28 ऑक्टोबर 2024 रोजी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त व 141-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांना प्रथम अहवाल सादर केला होता. संबंधित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर करून भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी शर्मा यांनी दि. 31 ऑक्टोबर 2024 रोजी संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ प्रशासकीय कारवाई करण्यासाठी संबंधित विभागांना अहवाल पाठविला. भविष्यात पुन्हा असा प्रकार होवू नये, यासाठी प्रशासकीय कारवाईसोबतच संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची कठोर कारवाई निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली.
संबंधितांवर प्रशासकीय कारवाई सुरू असताना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांना दि. 08 नोव्हेंबर 2024 रोजी ही घटना समजल्यानंतर त्यांच्यामार्फत तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.शर्मा यांच्याकडून संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर दि.08 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय शिस्तभंग विषयक कारवाई करणेबाबत पाठविलेल्या अहवालाच्या आधारे उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त व पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-4 यांनी संबंधित पाचही कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच भरारी पथक क्र.3 व 6 मध्ये तातडीने नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
निवडणूक कर्तव्यावर असलेल्या सर्व पथकांनी, अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेले निवडणूकीचे काम योग्यरित्या व नि:पक्षपाती करणेबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी कडक निर्देश दिले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी शिनगारे यांच्या या कठोर कारवाईमुळे मतदारसंघातील सर्वच पथक सतर्क झाले आहेत.