उत्कर्ष मंदिर मालाडच्या विद्यार्थ्यांची कर्जतच्या संशोधन केंद्रातील भेट ठरली संस्मरणीय

0

कर्जत – महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक काशिद यांच्या प्रेरणेने शिक्षण प्रसारक मंडळ मालाडच्या उत्कर्ष मंदिर शाळेतील इयत्ता १० वी च्या २१६ विद्यार्थ्यांची येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील प्रक्षेत्र भेट आणि सह्याद्री अतिथी गृहाच्या सभागृहात आयोजित ‘विद्यार्थी-शास्त्रज्ञ सुसंवाद’ कार्यक्रम संस्मरणीय ठरला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे हे होते तर प्रमुख पाहुणे उद्योजक विनायक काशिद होते.विशेष म्हणजे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे हे प्रमुख अतिथी म्हणून दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. व्यासपीठावर सहयोगी संशोधन संचालक डॉ. भरत वाघमोडे, प्रगतशील शेतकरी व उद्योजक श्रीधर गांगल,उत्कर्ष मंदिरच्या मुख्याध्यापिका प्रतिभा अडूरकर,कृषिविद्यावेत्ता डॉ. विजय सागवेकर,मत्स्य शास्त्रज्ञ डॉ. शशिकांत मेश्राम, खार जमीन संशोधन केंद्राचे प्रभारी डॉ. प्रवीण वणवे उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. भावे म्हणाले की, शेतीसारखा फायदेशीर व्यवसाय अन्य कोणताही नाही. कोरोनासारख्या कितीही महामाऱ्या आल्या तरी शिक्षण आणि कृषी अव्याहतपणे सुरू राहील. दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्याची मानसिकता सोडून विद्यार्थ्यांनी कृषिक्षेत्रात आभाळभर संधी उपलब्ध असल्याने स्वतःचा व्यवसाय वा उद्योग उभारण्याची मनीषा ठेवून शिकलेल्या व्यक्तींना सोबत घेवून कृषिपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगाद्वारे रोजगार निर्माणकर्ते व्हायला हवे. महासंचालक भागडे म्हणाले की, विद्यार्थ्यांना कृषी संशोधन केंद्रात आणून कृषीविषयक माहिती देण्याचा उपक्रम स्तुत्य व प्रशंसनीय आहे.राज्यातील कृषी पदवी व पदविकांसाठी असलेल्या विविध अभ्यासक्रमांची, त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींची माहिती त्यांनी दिली. भविष्यात जर्मनी देशात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या विविध संधींचा ऊहापोह करीत त्यांनी जर्मन भाषा आत्मसात करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. विनायक काशिद म्हणाले की, विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय ठेवून ते पूर्ण करण्याचा ध्यास घेत स्वप्ने बघावी, तन्मयतेने अभ्यास करावा व कृषी क्षेत्रातील अमर्याद संधीचा लाभ घेत नावलौकिक वाढवावा.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. शिनगारे यांनी कृषिक्षेत्रातील संशोधन कार्यामुळे विविध पीक उत्पादकतेत झालेल्या वाढीचा आढावा घेत अमेरिकन लाल मिलो आयातीवर अवलंबून असलेल्या आपल्या देशाची अन्नसुरक्षा बळकट झाली असून देश प्रमुख निर्यातदार तर झालाच आहे शिवाय देशाकडे बफर मानकापेक्षा जास्त अन्नसाठा उपलब्ध आहे,असे अभिमानाने नमूद केले. अत्यंत गरीब कुटुंबातूनआलेला,अनवाणी पायाने शाळेत जाणारा विद्यार्थी आज विद्यापीठाचा संशोधन संचालक कसा झाला, ही स्वतःची यशकथा त्यांनी विदित करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्द बाळगावी, असा मार्मिक सल्ला त्यांनी दिला. यावेळी प्रतिभा अडूरकर आणि शिक्षक प्रतिनिधी रंगनाथ गोड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात डॉ. भरत वाघमोडे यांनी संशोधन केंद्राच्या देदीप्यमान वाटचालीचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले.यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात विविध विभागाचे शास्त्रज्ञ, अधिकारी,कर्मचारी, मालाडचे शिक्षकवृंद प्रामुख्याने उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech