मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा दिवशी विठ्ठलाचे मुख दर्शन दिवसभर

0

पंढरपूर : मराठी नव वर्ष आणि साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढी पाडवा. या दिवशी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे मुख दर्शन दिवसभर घेता येणार आहे. सध्या विठ्ठल मंदिराचे संवर्धनाचे काम सुरु असल्याचे देवाचे पायावर डोके ठेवून दर्शन बंद आहे. मात्र भाविकांसाठी सकाळी मुख दर्शनाची सोय केली आहे. पाडव्याच्या दिवशी म्हणजे ९ एप्रिल रोजी पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत मुख दर्शन भाविकांना घेता येईल अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक आतुरलेला असतो. मात्र सध्या श्री विठ्ठल मंदिराचे संवर्धनाचे काम सुरु आहे. त्यामुळे सध्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे मुख दर्शन म्हणजे लांबून दर्शन घेता येत आहे. हे दर्शन पहाटे ५ ते सकाळी ११ वाजेपर्यंत भाविकांना घेता येत आहे. मात्र दि ९ एप्रिल रोजी गुढी पाडवा आहे. या दिवशी राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात. ही बाब ध्यानात घेवून मंदिर समितीने देवाच्या मुख दर्शनाच्या वेळेत फक्त एक दिवस म्हणजेच पाडव्याची दिवशी वाढ केल्याची माहिती औसेकर महाराज यांनी दिली आहे. गुढी पाडवा या दिवशी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे मुख दर्शन पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांना घेता येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech