कीव : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध अनेक प्रयत्नांनंतरही थांबण्याची चिन्हे दिसत नाही आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी एक मोठा दावा केला आहे.रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचा लवकरत मृत्यू होईल आणि त्याबरोबरच दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचीही अखेर होईल, असा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केला आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉ यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर झेलेन्स्की यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, व्लादिमीर पुतीन यांचा लवकरच मृत्यू होईल, हे एक वास्तव आहे, त्यानंतर या युद्धाची अखेर होईल, असा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केला.तसेच झेलेन्स्की यांनी रशियासोबत असलेल्या युद्धाबाबतही मोठं भाकित केलं आहे. शांततेसाठी प्रयत्न सुरू असतानाही रशियाकडून युद्ध लांबवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, युद्ध सुरू राहावं, असं रशियाला वाटतं. त्यामुळे ते हे युद्ध लांबवत आहेत. युद्ध संपुष्टात आणण्यासाठी रशियावर दबाव आणण्याची आवश्यकता आहे.
दरम्यान, मागच्या अनेक महिन्यांपासून रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पुतीन यांचे सतत खोकत असल्याचे आणि हाता पायाला झटके येत असल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले होते. या व्हिडीओंनंतर या अफवांना बळ मिळाले होते. व्लादिमीर पुतीन यांना पार्किंसनचा आजार असून, त्यांना कर्करोगही झाला असल्याचे दावे अनेक वृत्तांमधून करण्यात आले होते. मात्र या वृत्तांना दुजोरा मिळाला नव्हता. तसेच रशियन प्रशासनानेही हे दावे फेटाळून लावले होते.