मुंबई – लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा सोमवारी म्हणजेच २० मे रोजी पार पडणार आहे. तसंच आणखी दोन टप्प्यांमध्ये निवडणूक संपणार आहे तर ४ जून रोजी निकाल लागणार आहे. ४०० पारचा दावा एनडीएसह भाजपाने केला आहे. प्रचार शनिवारी थंडावला आहे. मात्र मुलाखती देणं सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लोकसत्ताला मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत कल्याण आणि ठाणे या मतदारसंघात आम्ही घवघवीत मताधिक्याने जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे. तसंच मोदींना जितक्या शिव्या द्याल तितक्या अधिक मतांनी ते निवडून येतील असा टोला विरोधकांना लगावला आहे.
तुमचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभेच्या जागेसाठी भाजपने इतका आग्रह धरणे तुम्हाला पटले का, या प्रश्नावर “एखाद्या जागेवर आग्रह धरणे हा त्यात्या पक्षाचा अधिकार असतो”, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. कोणी कोणत्या जागेसाठी आग्रह धरला हा विषय आता मागे पडला आहे. जागा ठरल्या, उमेदवार ठरला. आता आम्ही एकदिलाने काम करत आहोत. भाजपचे वरिष्ठ नेते गणेश नाईक, त्यांचे पुत्र संजीव आणि संदीप पुर्ण ताकदीने ठाण्याची जागा जिंकण्यासाठी मैदानात उतरले आहेत. ‘नरेश म्हस्के माझा जुना कार्यकर्ता आहे’ असे वक्तव्य स्वत: नाईक यांनी केले आहे. ठाणे हा राष्ट्रभक्ती विचारांनी भारलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात राष्ट्रभक्तीने प्रेरीत असलेले नागरिक रहातात. रामभाउ म्हाळगी, राम कापसे यांच्यासारख्या थोर नेत्यांनी खासदार म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. ठाण्यात कोणी कसलाही प्रचार करो, हा मतदारसंघ आम्ही विक्रमी मतांनी जिंकू”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लगतच असलेल्या कल्याणात श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कामाची पावती तेथील मतदार त्यांना देतील. श्रीकांत यांनी केलेल्या कामाचा मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी भगवा ध्वज जीव की प्राण होता. पण आज उध्दव ठाकरे यांच्या भाषणातून, प्रचारातून, मिरवणुकांमधून भगवा ध्वज गायब झाला आहे. विशिष्ट समाजाची मते मिळविण्यासाठी त्यांना हिंदुत्व नकोसे झाले आहे. अल्पसंख्यांकाच्या तुष्टीकरणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या राष्ट्रविचाराने प्रेरीत असलेल्या संघटनेवर टीका करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. तेव्हा आता मुंबई, ठाणेकर त्यांना त्यांची जागा दाखवतील, अशी सणसणीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
“महाराष्ट्रात महायुतीला विरोधक कडवी लढत देत आहेत असे वातावरण जाणीवपूर्वक तयार केले गेले. ठराविक वर्ग नाराज असल्याचा अपप्रचार विरोधकांकडून केला गेला. राज्यातील काही मतदारसंघात महायुतीला आव्हान आहे असे वातावरण उभे केले गेले. हे कसे खोटे आणि चुकीचे होते याचे उत्तर सर्वांना येत्या चार जून रोजी मिळेलच”, असे मुख्यमंत्री म्हणाले. “ मी दाव्याने सांगतो; राज्यात झालेल्या पाचही टप्प्यांच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामागे ठामपणे उभा आहे. मुंबई महानगर पट्टयातही काही वेगळी परिस्थिती नाही. येथेही आम्ही विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर मतदारांपुढे जात आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीच्या किमान ४५ जागा निवडून येतीलच शिवाय मुंबई महानगर पट्टयातील सर्वच्या सर्व १० जागांवर शिवसेना-भाजपला विजय मिळेल”, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.
नरेंद्र मोदी यांना शिव्या देण्याचा एकमेव कार्यक्रम विरोधकांपुढे उरला आहे. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मोदींचा उल्लेख विरोधकांनी ‘मौत का सौदागर’ असा केला. गेल्या निवडणुकीत ‘चौकीदार चोर है’ असे ही मंडळी म्हणत. आता तडीपार वगैरेसारखी खालची भाषा वापरत आहात. एक गोष्ट लक्षात घ्या विरोधक मोदींना जितक्या शिव्या देतील तितके लोकांचे समर्थन त्यांना वाढत जाईल. आधी २०१४, २०१९ मध्ये काय झाले हे विरोधकांनी पाहीले आहेत. यावेळीही मोदी रेकॉर्ड ब्रेक जागांनी निवडणून येतील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.