मुंबई : राज्यातील धरणातील पाणी साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला असला तरीही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन योग्य नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिल्या. राज्यातील धरणातील पाणी साठा आणि पाणी पुरवठा याबाबतचे सादरीकरण जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत केले.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सूचना दिल्या.त्यांनी सांगितले की, राज्यातील धरणातील पाणी साठा अद्यापही समाधानकारक आहे. पाणी टंचाई जाणवत असलेल्या गावांमध्ये टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत अद्याप खूप चांगली परिस्थिती आहे. कारण गेल्या वर्षी याच तारखेला राज्यात २५६४ टॅंकर सुरू होते. मात्र सध्या ७९६ टॅंकर सुरू आहेत. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षी २६३ टॅंकर सुरू होते. मात्र सध्या अद्याप एकही टॅंकर सुरू नाही. मात्र तरीही संभाव्य परिस्थिती गृहीत धरून पाणी पुरवठा बाबतचे नियोजन करावे.
राज्यात अठरा जिल्ह्यात ७९६ टॅंकरने पाणी पुरवठा राज्यातील अठरा जिल्ह्यातील ६४४ गावे आणि २०५१ वाड्यात ७९६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज देण्यात आली. राज्यातील धरणातील पाणी साठा आणि पाणी पुरवठा याबाबतचा आढावा घेण्यात आला. राज्यात सद्यस्थितीत ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापुर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, अमरावती, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ या १८ जिल्ह्यात शेवटचा पर्याय म्हणून टँकरने ६४४ गाव आणि २०५१ वाड्यांमध्ये एकूण ७९६ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
राज्यातील छत्रपती संभाजीनगर महसुली विभागात सर्वाधिक म्हणजेच, एकूण २७५ टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सर्वाधिक, १९२ टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मागील वर्षी याच कालावधीत २०२६ गावे व ४९७२ वाड्यांमध्ये एकूण २५६४ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता, अशी माहिती देण्यात आली
राज्यातील एकूण पाणीसाठा
२४ एप्रिल २०२४ आणि २४ एप्रिल २०२५ ची स्थिती
मोठी धरणे: ८५५९ दलघमी/ आज: १०,४०१ दलघमी
मध्यम धरणे: २४३८ दलघमी/ आज: २५७२ दलघमी
लघु धरणे: २०२५ दलघमी/ आज: २१०१ दलघमी
राज्यातील प्रमुख धरणातील उपयुक्त पाणी साठा ( धरणांचे नाव, २४ एप्रिल २०२४ रोजीचा साठा, २४ एप्रिल २०२५ रोजीचा साठा)
गोसीखुर्द, ९.४७, ५.६७,
तोतलाडोह २०.४६, २०.७४,
ऊर्ध्व वर्धा ९.९७, ९.६४.
जायकवाडी ८.८७, ३३.५१
मांजरा ०.२८, २.०३
हतनूर ४.५१, ४.५१
गंगापूर २.४८, ३.०७
कोयना ३५.९८, ३४. १४
खडकवासला १.०६, ०.९६
भातसा १२.९१, १४.६५
धामणी ०.०७, ०.०७.