चिमुकल्याचे लष्कराला प्रेरणादायी पत्र

0

– वायनाडमधील मदतकार्याबद्दल, सैन्यात भरती होऊन देशाचं रक्षण करण्याचा निर्धार

केरळमधील वायनाडमध्ये आपत्तीजनक भूस्खलनामुळे मोठं नुकसान झालं. सामान्य जनजीवन विस्कळीत होवून अनेक नागरीकांचे प्राण गमावण्याची वेळ येथील नागरिकांवर आली असून आता मृतांची संख्या ३२५ च्या वर पोहोचली आहे. इस्रोने सॅटेलाईट फोटो घेऊन केरळमधील १३ फुटबॉल स्टेडियम मैदानाइतके क्षेत्र उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. दरम्यान भारतीय लष्कराकडून सातत्याने बचावकार्य सुरू आहे. अशातच केरळमध्ये तिसरीत शिकणाऱ्या रेयानने मल्याळममध्ये सैनिकांना लिहिलं आहे. त्याच्या या पत्राला लष्कराने उत्तरही दिलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

रेयानने पत्रात लिहिलं आहे की, डियर इंडियन आर्मी, माझ्या आवडत्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे मोठा विध्वंस झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना तुम्ही वाचवत असलेलं पाहून मला खूप अभिमान आणि आनंद झाला. तो व्हिडीओ पाहिला ज्यात तुम्ही तुमची भूक भागवण्यासाठी बिस्किटं खात आहात आणि पूल बांधत आहात. या दृश्याने मला खूप प्रभावित केलं आणि प्रेरणा दिली. मीही एक दिवस सैन्यात भरती होऊन माझ्या देशाचं रक्षण करेन.

सदर पत्र लष्कराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केले आहे. पत्र शेअर करताना त्यांनी लिहिलं की, डियर रेयान, तुझ्या हृदयातून आलेले शब्द आम्हाला खूप भावले आहेत. संकटकाळात आशेचा किरण बनणे हे आमचे ध्येय आहे आणि तुझं पत्र आमच्या ध्येयाची पुष्टी करत आहे. तुझ्यासारखे हिरो आम्हाला आमचं सर्वोत्तम देण्यासाठी प्रेरणा देतात. आम्ही त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत जेव्हा तू आर्मीचा युनिफॉर्म परिधान करून आमच्यासोबत उभा राहशील. आपण एकत्र उभं राहू आणि देशाला अभिमान वाटावा यासाठी काम करू. तरुण योद्धा, तुझ्या धैर्याबद्दल आणि प्रेरणेबद्दल धन्यवाद.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech