मिरॅकल केबल कंपनीतील सर्व कामगारांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे – नरेंद्र पवार 

0

त्या २५९ जणांना कामावर घेतल्यावरच व्यवस्थापनाशी चर्चा करणार- महाराष्ट्र परिश्रम संघाचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांचे आश्वासन

अंबरनाथ : कंपनी आणि कामगारांचे हित जपणारी संघटना असे ब्रीदवाक्य घेऊन स्थापन झालेली महाराष्ट्र परिश्रम संघटना ही अंबरनाथमधील मिरॅकल केबल कंपनीतील सर्व कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचा विश्वास संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे. मिरॅकल केबल कंपनीच्या गेटवर झालेल्या द्वारसभेत पवार यांनी बोलताना हा विश्वास व्यक्त केला. तसेच कामावरून काढून टाकलेल्या २५९ जणांना पुन्हा कामावर घेणार नाही तोपर्यंत कंपनी व्यवस्थापनाशी कोणतीही चर्चा होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अंबरनाथ येथील मिरॅकल केबल कंपनी व्यवस्थापनाने नियमबाह्य पद्धतीने २५९ कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. तसेच हाऊस किपिंगच्या नावाने कंपनीतील २६० कामगारांकडून नियमबाह्य पद्धतीने मुख्य स्वरुपाचे काम केले जात असल्याची माहिती महाराष्ट्र परिश्रम संघाचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांना मिळाली होती. त्यानुसार पवार यांनी संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांसमवेत तातडीने या कंपनीच्या ठिकाणी धडक देत द्वारसभा घेतली.

कल्याणच्या मोहने परिसरात सुरू असलेल्या पूर्वीच्या एनआरसी आणि आताच्या अदानी कंपनीच्या नियमबाह्य कार्यपद्धतीविरोधातही आपण लढत आहोत. आपल्या कामगार संघटनेच्या नावामध्ये संघ असा उल्लेख असून आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक म्हणूनही ओळखले जातो. त्यामुळे मिरॅकल केबल कंपनीतील कर्मचाऱ्यांना आपण कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळवून देणारच अशी गर्जना त्यांनी या द्वारसभेमध्ये केली. आमच्या कामगारांना इथून दुसऱ्या ठिकाणी अजिबात हलवायचे नाही. आणि नियमबाह्य भरती केली तर एकही कंत्राटदार, कर्मचारी आम्ही भरती होऊ देणार नाही. आम्ही कंपनी व्यवस्थापनाला पुढील 3 दिवसांची मुदत देत असून संघर्ष नको असेल तर इथल्या कर्मचाऱ्यांना न्याय द्या असा मागणीवजा इशारा पवार यांनी यावेळी कंपनी व्यवस्थापनाला दिला आहे.

तसेच कंपनी व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांबाबत असलेल्या या मनमानी आणि नियमबाह्य कारभाराविषयी आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह राज्याच्या कामगार मंत्र्यांनाही आपण यासंदर्भात निवेदन देणार आहोत. त्यामुळे येत्या ३ दिवसांमध्ये कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास संघर्षाला तयार राहण्याचा इशारा देत या संघर्षाला सर्वस्वी कंपनी व्यवस्थापनच जबाबदार असेल असेही यावेळी स्पष्ट केले आहे.

तर कंपनी आणि कामगारांचे हित जपणारी संघटना हे ब्रीद घेऊन आपण संघटना स्थापन केली असून कंपनी व्यवस्थापनाने आपल्या मागण्या मान्य केल्या तर तुम्हा कर्मचारीही कंपनीच्या प्रगतीसाठी, वाढीसाठी मनापासून काम करतील असे वचन आपण त्यांना देऊ. आणि तुम्हा सर्व कर्मचाऱ्यांनाही या वचनाला जागून कंपनी हितासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील अशा शब्दांत नरेंद्र पवार यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

या द्वारसभेला महाराष्ट्र परिश्रम संघाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह संघटनेचे सचिव दिलीपकुमार मुंढे, उपाध्यक्ष सुरेंद्रसिंग यादव, सहसचिव सुरेश सकपाळ, खजिनदार धनाजी घरत यांच्यासह दादाजी लिंडाईत, अरुण म्हात्रे, भीमराव बाविस्कर, मंगल सावंत आदी सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान यावेळी मिरॅकल केबल कंपनीच्या गेटवर उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र परिश्रम संघाच्या नामफलकाचेही नरेंद्र पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech