मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तब्बल २१ वर्षे वास्तव्य असलेल्या बीआयटी चाळीतील दोन खोल्यांचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. आमदार भाई गिरकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. तर इंदू मिल येथील डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे कामही शेवटच्या टप्प्यात असून तेही लवकरात लवकर पूर्ण होईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
महाविकास आघाडीचे सरकार असताना १४ एप्रिल २०२१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री यांनी परळ येथील बीआयटी चाळ क्रमांक १ ला भेट देऊन तेथील खोली क्रमांक ५० आणि ५१ ज्या ठिकाणी डॉ. आंबेडकर २१ वर्षे वास्तव्य होते त्याचे राष्ट्रीय स्मारक होणार, अशी घोषणा केली होती. परंतु, त्यानंतर पुढे काय कार्यवाही झाली, असा प्रश्न गिरकर यांनी विचारला होता. याला उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, बीआयटी चाळ क्रमांक १ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई यांचे वास्तव्य असलेल्या खोली क्र. ५० व ५१ येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सुसाध्यता अहवाल (फिजिबिलिटी रिपोर्ट) प्राप्त करून पुढील आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.
या चाळीत इतर रहिवासी सध्या राहतात. त्यांचे पुनर्वसन कुठे करायचे हा प्रश्न आहे. त्यासाठी आराखडा तयार करावा लागेल. या अनुषंगाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही खोल्यांचे स्मारकात रूपांतर करण्यासाठी एक समिती नेमण्याचीही घोषणा त्यांनी केली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याविषयीची केवळ घोषणा केली होती. मात्र, अर्थसंकल्पात याविषयी एक रुपयाचीही तरतूद केली नसल्याची माहिती सामंत यांनी दिली. मात्र, आमचे सरकार हे स्मारक तयार करण्यासाठी प्राधान्याने लक्ष देईल, असे ते म्हणाले.