मुंबई – तलाठी भरती प्रक्रियेतील कथित भ्रष्टाचारावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात संघर्ष उफाळला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि थोरात यांनी भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यावर विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर देत, थोरात यांना भ्रष्टाचार सिद्ध करण्याचे आव्हान दिले.
विखे पाटील यांनी असेही म्हटले की, थोरात भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाहीत, तर त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा.थोरात यांनी या आरोपांना कडक उत्तर दिले. त्यांनी खुलासा केला की, याच वर्षी फेब्रुवारीत, त्यांच्या अखत्यारीतील जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठी भरतीतील गैरप्रकारांचा गोपनीय अहवाल राज्याच्या अपर मुख्य सचिवांना पाठवला होता.
थोरात यांनी विखे पाटील यांना प्रश्न केला की, या अहवालावर त्यांनी काय कार्यवाही केली, हे जनतेला आणि विद्यार्थ्यांना स्पष्ट करावे.थोरात यांनी आरोप केले की तलाठी भरतीमध्ये अनेक गैरप्रकार घडले असून, त्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही. तसेच, त्यांनी विखे पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करताना म्हटले की, “सौ चूहे खा के बिल्ली चली हज को” अशी त्यांची अवस्था झाली आहे.थोरात यांनी म्हटले की, रोहित पवार यांनी या संदर्भात अहवाल पाठवला आहे, आणि जर आवश्यक असेल तर आपणही अहवाल पाठवू शकतो. विखे पाटील यांनी या प्रकरणावरून सत्य उघड करण्याचे आव्हान स्वीकारावे, असेही थोरात यांनी सांगितले.