मनमाड – विधानसभेच्या आगामी निवडणुकीत महायुती सरकारच्या चिंधड्या उडवत महाआघाडी सरकार आल्यावर सर्वांचा हिशेब चुकता केला जाईल, हा आमचा धोरणात्मक निर्णय आहे, असे सांगून खासदार संजय राऊत यांनी राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असा आशावाद व्यक्त केला. मनमाड शहरात शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांचा अभीष्टचिंतन सोहळा व आईसाहेब जिजाऊ भवनात जिल्हाप्रमुख धात्रक यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद््घाटनानिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या जाहीर सभेत खासदार राऊत बोलत होते. व्यासपीठावर गणेश धात्रक यांच्यासह माजी आमदार ॲड. जगन्नाथ धात्रक, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार डाॅ. अद्वय हिरे, जयंत दिंडे, सुनील बागूल, दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, मनमाडचे माजी नगराध्यक्ष प्रवीण नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी ज्येष्ठ शिवसैनिक संतोष बळीद, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रईस फारुकी, माजी आमदार डॉ. हिरे आदींची भाषणे झाली. सत्कारमूर्ती गणेश धात्रक यांनी करंजवण योजनेचे खरे शिल्पकार उद्धव ठाकरे असून, त्यांच्या कार्यकाळात या योजनेला मंजुरी मिळाली. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामार्फत बी वन बी टूचा प्रश्नही मार्गी लावला, असे सांगितले. खासदार राऊत यांनी राज्यातील महायुती सरकार, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार यांच्याविरोधात तोफ डागली. विधानसभा निवडणूक झाल्यावर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताक्षणी केंद्रातील मोदी सरकार पायउतार होईल, अशी भविष्यवाणी करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रुजविलेले निष्ठेचे बीज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उगवले आहे आणि हे निष्ठावंत तरुण या पन्नास खोक्यांना पुरून उरतील. पुढील वर्षी आमदार गणेश धात्रक यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याला येण्याचा योग येईल, असे सांगून नांदगाव मतदारसंघातून गणेश धात्रक यांची दावेदारी भक्कम केली. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राला इतिहास आहे. महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, पण गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला. अहमदाबादजवळील गावात औरंगजेबाचा जन्म झाला. औरंगजेबात ज्या खुबी होत्या, त्या सर्व नरेंद्र मोदींत आहेत, असे त्यांनी सांगितले. खा. राऊत यांच्या हस्ते धात्रक यांच्या संपर्क कार्यालयाचे उद््घाटन करण्यात आले.