चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन ‘पुष्पा 2’ चित्रपटानंतर आता दिग्दर्शक अॅटलीच्या A6 चित्रपटामध्ये दिसणार आहे.तर या चित्रपटात आता अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुद्धा दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचं शूटिंग सुरु होण्याआधी अॅटली प्रियांका चोप्रासोबत या चित्रपटाविषयी बोलणार आहे. जर तिने चित्रपटासाठी होकार दिल्यास अॅटलीच्या या चित्रपटात प्रियांका महत्त्वाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ प्रमाणेच यात अल्लू अर्जुनचा देखील डबल रोल असणार आहे. तर या चित्रपटाची घोषणा अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशी करण्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, प्रियांका चोप्रा दिग्दर्शक एसएस राजामौलीसोबत आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता महेश बाबू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट पुढच्या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे, अल्लू अर्जुन आणि प्रियांकाला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांना देखील उत्सुकता आहे.