अंजली दमानिया यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा फौजदारी खटला दाखल करणार – धनंजय मुंडे

0

मुंबई : अंजली दमानिया यांनी आज दिवसभरात दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा खोटे व बेछूट आरोप केले आहेत. या विषयासह विविध विषयांवर मोघम आरोप करणाऱ्या अंजली दमानिया ताई यांच्या विरोधात आपण आता फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी आता ट्विट केले आहे.

अंजली दमानिया यांनी सकाळी एक पत्रकार परिषद घेत कृषी विभागाने मार्च 2024 मध्ये राबवलेल्या विविध खरेदी बाबत अर्धवट माहितीच्या आधारे व एका वेबसाईटवरील भावांचे संदर्भ देत काही वस्तूंची चुकीच्या पद्धतीने खरेदी झाल्याचे आरोप करत कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा दावा केला होता.

तसेच सदरील खरेदी प्रक्रिया ही चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या होत्या. यावर तत्कालीन कृषी मंत्री व सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेत सविस्तर खुलासा सादर केला तसेच संपूर्ण प्रक्रिया ही खरेदी प्रक्रियेच्या नियमातील तरतुदीनुसार तसेच राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री वित्त यांच्या मान्यतेनुसारच झाली होती असे स्पष्ट केले होते.

त्याचबरोबर अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून, नॅनो खते देणाऱ्या इफको कंपनीकडून भारतात सर्वत्र एकाच दराने ही खते विकली जातात. मोठ्या प्रमाणात खरेदी असल्याने तरीसुद्धा संबंधित कंपनीकडे जवळपास आठ रुपये प्रति लिटर इतका दर कमी करण्यात आला होता तसेच हा दर देशात सर्वात कमी महाराष्ट्रात होता ही वस्तुस्थिती आहे.

त्याचबरोबर ने स्प्रे पंप खरेदी, कापूस भरणा बॅग खरेदी तसेच गोगलगाईंचा प्रादुर्भाव नष्ट करणाऱ्या मेटलडीहाईड या रसायन्याची खरेदी सुद्धा प्रमाणित शासकीय दराप्रमाणे तसेच अतिशय पारदर्शक पद्धतीने टेंडर प्रक्रिया राबवूनच करण्यात आले होते हे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यात कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार झालेला नसल्याचे स्पष्ट होते.

अंजली दमानिया बिनबुडाचे व खोटे आरोप करून सनसनाटी निर्माण करतात आणि मीडियावर प्रसिद्धी मिळवून आपले हेतू साध्य करून घेतात असा धनंजय मुंडे यांनी केलेला आरोप अंजली दमानिया यांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसत असून आता अंजली दमानिया या विचलित झाल्या असून पुन्हा एकदा माध्यमांच्या समोर आल्या व बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करत सुटल्याचे दिसून आले.

मागील ५८ दिवसांपासून कुठल्याही तपास प्रक्रियेवर काही प्रभाव पडू नये म्हणून शांत व संयमाने राहिलेले धनंजय मुंडे यांनी मात्र आता अंजली दमानी यांच्या खोट्या आरोपांवर मौन सोडले आहे. तर अंजली दमानिया यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला (criminal differmation case) दाखल करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech