किशोर आपटे
मुंबई – राज्यातील महायुती महायुती सरकारमधून बाहेर पडण्याची रणनीती भाजपा तयार करत असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून समजते. आगामी विधानसभा अधिवेशन संपताच भाजपा महायुती सरकारमधून बाहेर पडेल आणि या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता आहे. आज दिल्लीतील बैठकीत यासंदर्भात केंद्रीय नेत्यांसमोर प्राथमिक चर्चा झाली असून लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठकीत घेण्यात येईल, असे या सूत्रांचे म्हणणे आहे.
याबाबत सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी तीनही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत या रणनीतीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते आहे. विधान परिषदेच्या अकरा जागा रिक्त होत असून त्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाट्याला ३, अजित पवार गटाच्या वाट्याला २ आणि भाजपाकडून ६ जागा भरल्या जाव्या, अशी मागणी होते आहे. विद्यमान संख्याबळावर महायुती सहा किंवा फार तर सात जागा जिंकण्याची शक्यता आहे. मात्र आठ जागा घेण्याबाबतही योजना तयार होते आहे. संख्याबळ पाहता विरोधक २ जागा निवडून आणू शकतात तर अतिरिक्त मतांच्या मदतीने महायुती अधिकच्या जागा मिळवू शकते.
याबाबत लवकरच महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपाकडून सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याबाबत निर्णयाची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत महाविकास आघाडीतील सदस्यांना मंत्रिपदाचे गाजर दाखवून रिक्त जागा भरून घेण्याचा पर्यायही विचाराधीन आहे. भाजपा संघटनात्मक बांधणीवर लक्ष देणार असून शिंदे-पवार यांच्यावर सरकार चालवण्याची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.