त्र्यंबकेश्वर : विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहे. दुर्गम भागात हिवाळी शाळेच्या माध्यमातून मुलांना दर्जेदार व गुणवत्ता पूर्वक शिक्षण प्राप्त होत आहे ही अतिशय कौतुकास्पद बाब असून हिवाळी शाळा राज्यासाठी पथदर्शी उपक्रम आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आज त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळी शाळेच्या नूतन इमारत (wonder world z.p. School) लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, गट विकास अधिकारी गजानन लेंडी, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. नितीन बच्छाव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिकच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर कानोज, सरपंच माया बागुल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, हिवाळी शाळेचे विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हिवाळी शाळेतील मुलांची गुणवत्ता ही अभूतपूर्व आहे. मुलांनी क्षणात मोठ्या संख्येचे बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार प्रकिया करून दाखविली. १३३० पर्यंत पाढे म्हणून दाखविले. भारतीय राज्यघटनेचे कलम सांगितले. येथील मुलांनी साकारलेली परसबाग, गायीचा गोठा इत्यादी गोष्टी पाहून मी थक्क झालो. आजच्या स्पर्धात्मक युगात या शाळेचे नाव देशपातळीवर अधोरेखित झाल्याशिवाय राहणार नाही. मुलांच्या बौद्धिक पातळीनुसार त्यांना शिक्षण देणारा हा शिक्षक हे एक अवलिया व जादुगार आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शिक्षक केशव गावित यांचे कौतुक केले.
ते पुढे म्हणाले, शिक्षक केशव गावित यांच्या जिल्हा परिषद शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रमाचा आदर्श इतर शिक्षकांनीही घ्यावा. हिवाळी शाळेसाठी आवश्यक सेवा-सुविधांची तरतूद शासनस्तरावर केली जाईल. हिवाळी शाळेस पुन्हा भेट देणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, शिक्षक केशव गावित व त्यांचे शिक्षक सहकारी अतिशय समर्पित भावनेने वर्षाचे ३६५ दिवस मुलांना ज्ञानार्जन करीत आहेत. महाराष्ट्रातून असे उपक्रमशील शिक्षक शोधून हिवाळी शाळेचा उपक्रम येणाऱ्या काळात राज्यभरात राबविला जाणार असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी पारंपरिक नृत्याने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम हिवाळी जुनी शाळा व मुलांनी तयार केलेल्या परसबागेची भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी हिवाळी शाळेच्या नवीन इमारतीला भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मुलांनी त्यांनी आत्मसात केलेली शैक्षणिक कौशल्ये मान्यवरांसमोर सादर केली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिक्षक केशव गावित यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला त्यांना शाळेसाठी पाच लाखांचे अर्थसहाय्य देण्यात आले. शाळेसाठी स्वतःची एक एकर जमीन देणारे शेतकरी हरिदास भुसारे यांचाही स्मृतिचिन्ह देवून यावेळी सत्कार झाला व त्यांनाही रुपये पाच लाख अर्थसहाय्य देण्यात आले. यानंतर गीव्ह फाउंडेशनचे रमेश अय्यर, विनीत व वीणा मालगावकर, आर्किटेक पूजा खैरनार, महेंद्र भोये, प्रमोद भोये यांचा सत्कार करण्यात आला.