अमरावती – जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयूमध्ये रात्रपाळी ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई न केल्याने डॉक्टर महिलेने कोतवाली ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून डॉ. नावेद पटेल शौकत पटेल (३४ रा. अंजनगाव सुर्जी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
संबंधित डॉक्टर महिला ३ जुलैला जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयूमध्ये रात्रपाळी ड्युटीवर होत्या. दरम्यान आपातकालीन कक्षामध्ये डॉ. नावेद हा सुध्दा रात्रपाळी ड्युटीवर होता. रात्रभर ड्युटी केल्यानंतर पहाटे ४ वाजताच्या सुमारास महिला डॉक्टर आपल्या सहकारी महिलेसोबत आयसीयूमधील एका बेडवर झोपल्या होत्या. दरम्यान नावेद आयसीयू कक्षात आला आणि झोपलेल्या अवस्थेत महिला डॉक्टरच्या अंगावरून त्याने हात फिरविल्याने त्या खडबडून जागे झाल्या. त्यांनी डॉ. नावेदची खरडपट्टी काढली. त्यानंतर रुग्णालयातील विशाखा समिती व जिल्हा वैद्यकीय अधिक्षक यांच्याकडे तक्रार केली. परंतु १० ते १५ दिवस झाले तरी संबंधीत अधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई न केल्याने डॉक्टर महिलेने मंगळवारी (ता. १६ जुलै) शहर कोतवाली ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला. यासंदर्भात जिल्हा वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिलीप सौंदळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बाहेरगावी असल्याचे सांगून फोन कट केला.