नवी दिल्ली : भारताचा टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया याला नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीने 10 मार्च रोजी राष्ट्रीय संघ निवड टेस्ट दरम्यान डोपिंग चाचणीसाठी नमुना देण्यात नकार दिल्याने चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीने (NADA) कुस्तीपटू बजरंग पुनियाच्या खेळण्यावर चार वर्षांची बंदी घातली आहे. डोपिंग विरोधी शिस्तपालन समितीने नियम 2.3 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवत ही कारवाई केली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तो कांस्यपदक विजेता होता.
सुरुवातीला 23 एप्रिल रोजी बजरंगला त्याच गुन्ह्यासाठी निलंबित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता, त्यानंतर त्याला जागतिक प्रशासकीय मंडळाने (UWW) निलंबित केले होते. या निलंबनाचा अर्थ असा आहे की, त्याला स्पर्धात्मक कुस्तीमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. बजरंगने सुरुवातीला निलंबनाचा निषेध केला होता, त्यानंतर 31 मे रोजी, नाडाच्या डोपिंग विरोधी पॅनेलने (ADDP) आरोपांची औपचारिक नोटीस जारी होईपर्यंत तात्पुरते निलंबन मागे घेतले. मात्र, पुन्हा 23 जून रोजी नाडाने त्याला या आरोपांची औपचारिक माहिती दिली. परंतु पुनियाने आरोपांविरुद्ध 11 जुलै रोजी अपील दाखल केले, त्यावर 20 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली. सर्व प्रक्रियेअंती उपरोक्त निर्णय घेण्यात आला आहे.