“तुमच्या तीन पिढ्यांमध्ये 370 परत आणण्याची शक्ती नाही”- अमित शाह

0

जम्मू – जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने राज्यात अनुच्छेद 370 परत लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज, जोरदार टीकास्त्र सोडले. तुमच्या तीन पिढ्यांमध्ये 370 कलम पुन्हा लागू करण्याची शक्ती नाही असे शाह यांनी ठणकावले. ते गुरुवारी उधमपूर येथे आयोजित प्रचारसभेत बोलत होते.

यावेळी शाह म्हणाले की, राहुल गांधी म्हणतात आम्ही काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा नक्कीच मिळेल, पण तो नरेंद्र मोदी देतील. ओमर अब्दुल्ला आणि राहुल बाबा म्हणतात की, आम्ही काश्मीरमध्ये लोकशाही आणू. पण, जम्मू-काश्मीरला 70 वर्षे याच 2 कुटुंबांनी विभागून ठेवले. यापूर्वी राज्यात शांततेत निवडणुका होत नसत. नरेंद्र मोदींमुळे आज राज्यात शांततेत निवडणुका होत असल्याचे शाह यांनी सांगितले. काँग्रेस आणि एनसीला जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद आणायचा आहे. हे लोक आपल्या देशाच्या संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूच्या फाशीच्या शिक्षेचा निषेध करतात. ओमर अब्दुल्ला दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालायचे. अफल गुरुला फाशी देणे गरजेचे होते. जो कोणी दहशत पसरवेल त्याला फाशीनेच उत्तर दिले जाईल. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद परत आणण्याची ताकद कोणामध्ये नसल्याचे शाह यांनी बजावले.

जम्मू आणि काश्मीरमधील 40 हजार लोकांच्या हत्येसाठी अब्दुल्ला आणि नेहरू जबाबदार आहे. ते उन्हाळ्यात लंडनमध्ये सुट्टी घालवत होते, महागड्या मोटारी चालवत होते. कोणत्याही पक्षाने नाही तर केवळ भाजपनेच जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा नायनाट केला आहे. आत्ताच राहुल बाबा इथे आले होते, ते म्हणाले की इथे बाहेरचे लोक राज्य करतात. त्यांचा निशाणा उप-राज्यपालांवर होता. पण, जम्मू-काश्मीरमध्ये सर्वाधिक राष्ट्रपती राजवट त्यांची आजी इंदिरा आणि वडील राजीव गांधी यांच्या काळात लावण्यात आली होती अशी टीका शाह यांनी केली.

यापूर्वी कधीच लाल चौकात ताजिया मिरवणूक, गणपती मिरवणूक आणि कृष्ण जन्माष्टमी साजरी झाली नाही. आज लाल चौकातही गणेश चतुर्थी साजरी करण्यात आली. हा दृष्टिकोनाचा फरक आहे. घाटीत 33 वर्षांनंतर चित्रपटगृहे सुरू झाली. फारुख साहेब, तुमच्यामुळे 33 वर्षे सिनेमा हॉल बंद होते. जग जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. एकीकडे एनसी, काँग्रेस आणि पीडीपी हे पक्ष जवळपास 40 वर्षांपासून या प्रदेशात दहशतवाद कायम ठेवत आहेत. दुसरीकडे, दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे शाह यांनी सांगितले.

राज्यात भाजपचे सरकार आल्यावर आम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा वार्षिक हप्ता 6 हजारांवरून 10 हजारांपर्यंत वाढवणार आहोत. याशिवाय, जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधणार, मेट्रो आणणार आहोत. दहशतवाद्यांनी उद्ध्वस्त केलेल्या 100 मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचे आश्वासन देखील गृहमंत्र्यांनी दिले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech