डॉ. अशोक शांता दगडू साळवे.( लेखक)
निवृत्त उप प्राचार्य,
श्रीमती पी. एन. दोशी महिला महाविद्यालय,
मुंबई .
—————————————————–
मुंबई – महाराष्ट्रातील निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असताना निवडणुकीमध्ये अनेक नवीन मुद्दे पुढे येताना दिसत आहेत. निवडणुकीला सामोरे जात असताना पक्षांनी अंतिम केलेले निवडणुकीतील मुद्दे आणि ज्या मुद्द्याच्या आधारे महाराष्ट्र आघाडी आणि महायुती या दोन राजकीय गटांनी ज्या मुद्द्यांच्या आधारे प्रचार सुरू केलेला होता त्यातील काही मुद्दे अधिक प्रभावशाली आणि काही मुद्दे कालबाह्य ठरत असल्याचे दिसत आहे, तसेच अनेक नवीन मुद्दे प्रचारामध्ये येताना दिसत आहे उदाहरणार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेला “बटेंगे तो कटिंग” नारा अथवा “एक है तो सेफ है” हा भारताचे पंतप्रधान श्री मोदी यांनी दिलेला नारा पुढे आणल्यानंतर त्याबद्दल समाज माध्यमांमध्ये आणि प्रचार प्रचारदरला बरीच चर्चा झाली. या मुद्द्यावर जशीच चर्चा सुरू झाली तशी डबल इंजिनचे सरकार, लाडकी बहीण हे मुद्दे मागे पडले. हे सर्व मुद्दे जरी असले तरी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात काही मुद्दे हे अधिक प्रभावी होत असताना दिसत आहेत.
मुंबईमध्ये महायुती विकासाचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा एकत्र करून लढत आहेत तर महाआघाडी समाजातील सर्व घटकांना न्याय देत सर्वांना एकत्र आणून निवडणूक लढत आहेत.
निवडणुकीच्या तोंडावरच मुंबईतील मेट्रो ३ या मेट्रो लाईनचे उद्घाटन करण्यात आले आणि उद्घाटन केल्यानंतर त्याला खूप चांगला प्रतिसादही मिळाला परंतु गेल्या पंधरा दिवसांमध्ये दररोज या मेट्रोमध्ये काही ना काही बिघाडी होताना दिसत आहे. मेट्रो तीन मध्ये दोन दिवसापूर्वी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या स्थानकाच्या तळमजल्यामध्ये आग लागली, त्याचप्रमाणे सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाला, त्याचप्रमाणे काही ठिकाणी गळती होताना दिसते. या ना त्या कारणाने ही लाईन दररोज बंद होते आणि प्रवाशांचा फळंबा होतो. यामुळे केवळ मेट्रो तीन ने प्रवास करणारे दोन लाख प्रवासी नाराज होतात असे नाही तर हा मुद्दा भाजपाच्या विकासाच्या मॉडेल वर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. मेट्रो तीन चा उपयोग करणारे प्रवासी व इतर लोक यांच्या मतावर परिणाम करणारा हा मुद्दा निश्चित ठरेल असे दिसते.
मुंबईतील गुजराती मतदार आणि इतर मतदारांमध्ये आणखी एक मुद्दा महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे शेअर बाजाराची घसरण. राष्ट्रीय शेअर बाजार किंवा मुंबई शेअर बाजार या दोन्ही शेअर बाजारामध्ये एकूण गुंतवणूक गुंतवणूकदारांपैकी फार मोठ्या प्रमाणावरील गुंतवणूकदार हे मुंबईतील आहेत आणि अर्थव्यवस्थेत निर्माण झालेली मंदी, त्यासोबतच वाढती महागाई आणि मोठ्या संख्येने कंपन्यांचे येणारे वाईट निकाल या सर्वांचा एकत्रित परिणाम हा भारतीय शेअर बाजारावर होत दिसत आहे. शेअर बाजारामध्ये साधारणपणे दहा ते बारा टक्के घसरण झालेली दिसते. शेअर बाजारातील काही कंपन्यांच्या किमतीमध्ये, खास करून सरकारी कंपन्यांच्या शेअरच्या किमतीमध्ये 50% पर्यंत घसरण झालेली दिसते आणि यामुळे शेअर बाजारातील व्यापारी आणि गुंतवणूकदारांचे करोडो रुपयांचे नुकसान झालेले आहे. या दोन मुद्द्याबद्दल प्रचारामध्ये कुठेही चर्चा होताना दिसत नाही परंतु याचा निश्चित परिणाम हा निवडणुकीच्या निकालावर होईल.
गेल्या काही वर्षांमध्ये शेतीमालांच्या किमतीचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर होताना दिसत आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाडा आणि विदर्भ या तीन विभागांमध्ये मागील काही वर्षात सोयाबीन या दोन पिकाचा नगदी पीक म्हणून उदय झालेला आहे. यावर्षी सोयाबीन पिकाला अतिशय कमी बाजार भाव मिळत असल्याने याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे, संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भ येथे होताना दिसत आहे. आणि हा परिणाम सर्व जाती व धर्मातील शेतकऱ्यांवर होताना दिसत आहे. सोयाबीनच्या घसरलेल्या किमती चा परिणाम मोठा परिणाम मतदानाच्या आकड्यावरती आणि निवडणुकीच्या निकालावरती होईल हे निश्चित.
ज्याप्रकारे मेट्रो तीन शेअर बाजारातील घसरण आणि सोयाबीनचे कोसळलेले भाव याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर नक्की होईल असे वाटते तशाच प्रकारे महागाईचा परिणाम सुद्धा निवडणूक टिकाऊलावर होईल असे वाटते. बाजारात वाढलेले कांद्याचे भाव आणि लसणाचे भाव हे महायुतीच्या विरोधात जातील असे दिसते. कांद्याचे भाव जरी वाढले असले तरी हा उत्पादनाचा हंगाम नसल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही तर तो फक्त व्यापाऱ्यांना होताना दिसतो. आणि जेव्हा जेव्हा शेतमालाच्या वाढलेल्या किमतीच्या फायदा शेतकऱ्यांना होत नाही आणि व्यापाऱ्यांना होतो तेव्हा तेव्हा जनमत हे भाजपविरोधी होताना दिसते. निवडणुकीला अवघे चार दिवस शिल्लक असताना या चारही प्रश्नांनी महायुतीच्या नेत्यांच्या छातीत धडकी भरवायला सुरुवात केलेली आहे. या चारही मुद्द्यांचा महाविकास आघाडी किती चांगला उपयोग करून घेते आणि या चारही मुद्द्यांना महायुती कशी बगल देते यावर बरेच काही अवलंबून आहेत.
तेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत जेवढा परिणाम मराठा आरक्षण, जातीनिहाय जनगणना, लाडकी बहीण, हिंदुत्व, बटेंगे तो कटिंग आणि एक है तो सेफ है या मुद्द्यांचा परिणाम जाणवेल तेवढाच किंबहुना त्यापेक्षा कितीतरी जास्त सोयाबीनचे भाव, महागाई, मेट्रो तीन मधील बिघाड आणि शेअर बाजारातील घसरण या मुद्द्यांचा परिणाम होईल असे वाटते.