लाडकी बहीण योजनेत आचारसंहितेचा अडसर नाही, आचारसंहितेपूर्वीच नोव्हेंबरचे पैसे दिले
उत्तर महाराष्ट्रातील परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन नक्की मदत करणार
आमदार चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
जळगाव (मुक्ताईनगर) – आतापर्यंतच्या इतिहासात एवढ्या योजना कधीही कुणी सुरू केल्या आणि राबवल्या नाहीत तेवढ्या गेल्या दोन वर्षात महायुती सरकारने यशस्वीपणे राबावल्या असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. आपण मुख्यमंत्री म्हणजे सीएम म्हणजे ‘कॉमन मॅन’ आहे मात्र मला जनतेला ‘सुपर मॅन’ करायचे असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. मुक्ताईनगर येथे आयोजित केलेल्या महायुतीच्या मेळाव्यात त्यानी आपले हे मत व्यक्त करत महायुतीचे प्रमुख म्हणून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
परतीच्या पावसामुळे कापूस आणि सोयाबीनच्या पिकांचे जिथे नुकसान झाले आहे. आशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. यावेळी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला. यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, जळगाव जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील तसेच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि आरपीआय महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.
यावेळी बोलताना, मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना दीड हजारांची किंमत कळणार नाही मात्र या एकनाथ शिंदेला सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस मात्र आणायचे आहेत असे सांगितले. राज्यातील लाडक्या बहिणीच लाडक्या भावाना येत्या 20 नोव्हेंबरला नक्की काय करायचे ते सांगतील असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.दिवाळी जवळ आलेली आहे, आणि आताच विरोधकांच्या बुडाखाली फटाके फुटू लागले आहेत. 23 तारखेला महायुतीच्या विजयाचा जो धमाका होईल तो आयटम बॉम्ब असेल, याच दिवशी चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचे फटाके या मुक्ताईनगर मध्ये फुटल्याशिवाय राहणार नाहीत असेही शिंदे म्हणाले.
चंद्रकांत पाटील हा बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावान शिवसैनिक आहे. एक कडवट शिवसैनिक आहे. गेल्या दोन वर्षात त्यांच्या या मतदारसंघातील विविध कामांसाठी पाच हजार कोटींचा निधी दिला आहे. हा देणारा मुख्यमंत्री आहे हा महायुतीच्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात हा दोन्ही हातांनी देण्याचे काम करत आला असल्याचे स्पष्ट केले. मी जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची संकल्पना मांडली तेव्हा अनेकांना ती फक्त निवडणूकीची घोषणा वाटली,चुनावी जुमला वाटली पैसे येणार नाहीत असे वाटले मात्र हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणारा आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे एका महिन्याच्या आत महिलांच्या खात्यात जमा करायला सुरुवात केली. त्यामुळे विरोधक चक्रावले, ‘बुरी नजर वाले तेरा मूह काला’ अशी त्यांची अवस्था झाली. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आचारसंहितेचा अडसर येणार याची पूर्वकल्पना असल्याने आम्ही ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबर महिन्याचे पैसे देऊन टाकले होते असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसची माणसे ही योजना बंद करण्यासाठी आधी मुंबईत आणि नंतर नागपुर कोर्टात गेले आहेत. मात्र मला खात्री आहे की माझ्या लाडक्या बहिणींच्या बाजूनेच कोर्ट निकाल देईल. काही जणांनी निवडणूक आयोगाने ही योजना बंद करायला सांगितल्याची अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. मात्र नोव्हेंबरचा हफ्ता अधिच दिलेला असून 20 तारखेनंतर आचारसंहिता संपल्यावर डिसेंबरचा हफ्ता देण्यात येईल आणि कुणीही कितीही प्रयत्न केले तरीही ही योजना बंद होणार नाही असे निक्षून सांगितले. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 33 हजार कोटींची गरज असून ही गरज आम्ही पूर्ण केलेली आहे. मी स्वतः गरिबी पाहिली आहे त्यामुळे माझ्या आयुष्यात जेव्हा संधी येईल तेव्हा सर्वसामान्य महिला भगिनींना मी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असे मी ठरवले होते त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यावर मी नेमके हेच केल्याचे शिंदे यांनी सांगितले. आम्ही तुम्हाला दीड हजारांवर ठेवणार नाही तुम्ही ताकद दिलीत तर दिडचे दोन हजार, दोनचे अडीच हजार, अडीचचे तीन हजार करू असेही त्यांनी जाहीर केले.
राज्यातील महायुती सरकार फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना करून थांबले नाही तर लेक लाडकी लखपती योजना, मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची योजना, महिलांना एसटी मध्ये 50 टक्के सवलत दिली. त्यामुळे तोट्यात चालणारी एसटी आज फायद्यात आली हे या सरकारने केलेले काम आहे.
मोदी सरकारने पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6 हजार देण्याचा निर्णय घेतला अजून त्यात राज्याकडून 6 असे 12 हजार देण्याचा निर्णय घेतला, शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला, साडे सात एचपी पर्यंतच्या कृषी पंपाना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कौशल्यविकास योजनेच्या माध्यमातून युवकांना 6 हजार 10 हजार आणि 12 हजार प्रशिक्षण भत्ता देणारे देशातील एकमेव सरकार आहे.ज्येष्ठासाठी तीर्थ दर्शन योजना सुरू केली. ज्यांना अयोध्या, शिर्डी, पंढरपूर जायचे आहे पण खिशात पैसे नाहीत अशा ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन योजना सुरू केली. एकाच कुटूंबातील वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही केल्याचे सांगितले.
धर्माच्या नावाखाली दिशाभूल करणाऱ्यांना वेळीच ओळखा
यावेळी मुस्लीम समाजातील नागरिकांना उद्देशून बोलताना, मुख्यमंत्री शिंदे यांनी आजवर धर्मधर्मात कधीही तफावत केली नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत देताना जात,पात,धर्म पाहिला जात नाही, लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील सर्व धर्मातील भगिनींना देण्यात येतात. ‘आनंदाचा शिधा’चे वाटप देखील सर्व धर्मियांना करण्यात येते, तसेच महात्मा फुले आरोग्यदायी योजनेची तरतूद वाढवून दिडची पाच लाख केली तेही सर्व धर्मियांना लागू करण्यात येत असल्याचे सांगितले.
राज्य शासनाने मौलाना आर्थिक विकास महामंडळातर्फे देण्यात येणारी शिष्यवृत्ती 25 ची 50 हजार केली. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची मर्यादा पाच लाखपासून वाढवून 30 लाख केली. शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांप्रमाणे मदरशात शिकवण्याऱ्या शिक्षकांचे मानधन देखील दुप्पट केले आहे. त्यामुळे शासनाने कुठेही भेदभाव केलेला नसून याबाबत गैरसमज पसरवणाऱ्यांना वेळीच ओळखा अशी अपेक्षा व्यक्त केली. गेल्या दोन वर्षात महायुती सरकारने सर्वसामान्य लोकांना न्याय देणारी अनेक लोकोपयोगी कामे केली असून आम्ही केलेल्या कामाची पोचपावती जनता नक्की दिल्याशिवाय राहाणार नाही असा विश्वास शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.