आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटकेंवर सीबीआयकडून गुन्हा दाखल

0

* खोटारडेपणा, गुन्हेगारी कट रचल्याचे प्रकरण!

मुंबई – आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्यावर खोटारडेपणा आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केल्याची माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिली आहे. हे प्रकरण १२०० कोटींच्या कथित घोटाळ्याच्या चौकशीत बनावट कागदपत्रे आणि सदोष कागदपत्रांच्या घटनांशी संबंधित आहे. त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १२०-बी, ४६६, ४७४ आणि २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावमधील बीएचआर राज्य सहकारी पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणाच्या तपासात अनियमितता असल्याच्या आरोपावरून आयपीएस भाग्यश्री नवटके यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुणे पोलीस दलात आर्थिक गुन्हे विभागाच्या उपायुक्त असताना भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्यीय पतसंस्थेतील घोटाळ्याच्या चौकशी दरम्यान भाग्यश्री नवटके यांनी तपासात जाणूनबुजून त्रुटी ठेवल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर हा गुन्हा सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. २०२० ते २०२२ या कालावधीत झालेल्या १२०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या तपासादरम्यान नवटके यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप आहे.

सीआयडीच्या अहवालाच्या आधारे पुणे पोलिसांनी भाग्यश्री नवटके विरुद्ध ऑगस्टमध्ये पहिला गुन्हा दाखल केला होता. या अहवालामुळे घोटाळ्याच्या तपासातील गंभीर त्रुटी समोर आल्या. महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या निर्देशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरणी सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं.

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या कथित घोटाळ्याशी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त नवटके यांची नियु्क्ती करण्यात आली होती. मात्र एका दिवसात एकाच गुन्ह्यांतर्गत तीन गुन्ह्यांची नोंद करणे आणि त्यांच्या उपस्थितीशिवाय तक्रारदारांच्या सह्या घेणे, अशा खोट्या घटनांमध्ये नवटके यांचा सहभाग असल्याचे सीआयडी तपासात उघड झाले होते. सीआयडीच्या अहवालानंतर महाराष्ट्राच्या गृह विभागाने पुणे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech