उबाठाने मुलाला उमेदवारी दिल्यानंतर बबन घोलपांनी दिला शिंदे गटाचा राजीनामा

0

नाशिक – चर्मकार समाजाच्या व देवळाली मतदार संघात सुचवलेली आवश्यक कामे न झाल्याचा ठपका ठेवत माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेना शिंदे गटाचा राजीनामा दिला आहे. गेल्या आठ महिन्यापूर्वी देवळालीचे पाच वेळा आमदार असलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

घोलप जरी शिंदे गटात गेले तरी त्यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप मात्र ठाकरे गटातच होते. यंदा देवळालीची जागा मिळवण्यासाठी त्यांनी मोठी पराकाष्ठा केली. पवार गटाला जागा सुटेल या आशेने योगेश घोलप पवार गटाच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याच्या तयारीत होते. मोठ्या उलाढालीनंतर काल देवळालीची जागा ठाकरे गटाच्या शिवसेनेला सुटली आणि उमेदवारीची माळ योगेश घोलप यांच्या गळ्यात पडली. त्यानंतर आज माजी मंत्री बबनराव घोलप यांनी चर्मकार समाजाची कामे व देवळाली मतदार संघात आवश्यक सांगितलेली कामे न केल्याने शिंदे गटाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. तसेच आगामी देवळालीच्या जागेवर पुत्र योगेश घोलप याला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी देऊन माझ्यावर मोठे उपकार केल्याचे सांगितले व त्या करणावरून राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. घोलप उद्या दुपारी मुबंई येथील मातोश्रीवर पुन्हा शिवबंधनात अडकणार आहेत. सध्या हे राजीनामा पत्र समाजमाध्यमावर वायरल होत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech