नाशिक – गेल्या आठवड्यात सतत कोसळलेल्या परतीच्या पावसाने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले असताना आता पाऊस उघडला असला, तरी डाउनी रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिवसातून तब्बल तीन वेळा द्राक्षबागा वाचवण्यासाठी कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. पाऊस उघडला असला, तरी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात दाट धुके, सततचे ढगाळ हवामान, सकाळच्या वेळी पडणारे दव यांपुढे द्राक्ष बागायतदार शेतकरी हतबल झाला आहे. द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिसरात आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात काळी जातीच्या द्राक्ष बागांची छाटणी होत असून, काही द्राक्षबागा डीपिंग अवस्थेत, काही फेलफूट, तर काही मोगरण्याच्या स्थितीत असून, पाऊस उघडल्यामुळे द्राक्षबागा छाटणीसही आता वेग येत आहे.
मात्र सुरुवातीच्या द्राक्ष बागांवर डाउनीचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक महागडी औषधे फवारणी करावी लागत असून, शेतकऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच काही द्राक्ष बागांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने गाळ तयार झाला आहे. दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने फवारणी करावी लागते. एकंदरीत द्राक्ष बागायतदारांसाठी चालू वर्षी सुरुवातीचा काळ मोठे संकट घेऊन आल्याचे पाहावयास मिळत आहे. द्राक्ष शेती धोक्यात : द्राक्ष बागांवर संकटे येणे हे नित्याचे झाले असून, भविष्यात अशा बेमोसमी पावसामुळे व सततच्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष शेती धोक्यात आली आहे. द्राक्ष शेतीसाठी नवनवीन व्हरायटीचा प्रयोग करणे गरजेचे बनले आहे. अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहे.