नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभेची जागा महायुतीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. शिंदे शिवसेनेने विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि माजी खासदार डॉ. हीना गावित या ह्या मतदारसंघात इच्छुक होत्या. मात्र शिंदे गटाला अक्कलकुवा जागा देण्यात आल्यानंतर गावित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युतीत तणाव निर्माण झाला आहे. डॉ. हीना गावित यांनी आपल्या उमेदवारीसाठी भाजप वरिष्ठ नेत्यांना विनंती केली होती. परंतु जागेची मागणी शिंदे गटाकडे झुकल्याने त्यांना अपक्ष निवडणूक लढण्याचा मार्ग स्वीकारावा लागला. यामुळे महायुतीत मतभेद निर्माण झाले असून बंडखोरीची शक्यता वर्तवली जात आहे.
गावित घराण्याचा अक्कलकुवा मतदारसंघात जुना प्रभाव असल्याने मतविभाजन होऊ शकते. त्याचा फटका शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे. अक्कलकुवा जागा २०१९ मध्ये शिवसेनेला सुटली होती. मात्र थोड्या फरकाने काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. या वेळी शिंदे गटाने ही जागा जिंकण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी केली. तथापि शिंदे गटातही एकता नाही. विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या गटासह जिल्हाध्यक्ष किरसिंग वसावे व जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह पराडके या दोघांनीही उमेदवारीसाठी दावे केले होते. त्यामुळे गटात दोन गट पडले आहेत. डॉ. हीना गावित यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे मतदारसंघात स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या स्थितीत मतांची विभागणी होऊन अचीतटीची टक्कर होईल. यामुळे महायुतीत अंतर्गत संघर्ष वाढला असून आगामी निवडणुकीत भाजप-शिंदे शिवसेनेतील तणाव महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो.