आम आदमी पक्ष महाराष्ट्रात दोन जागा लढविण्यास इच्छूक !

0

सिंधुदुर्ग – आम आदमी पक्ष महाराष्ट्र विधानसभेच्या दोन जागा लढविण्यासाठी इच्छूक असल्याचे आम आदमी पक्षाचे गोवा राज्य प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी म्हटले आहे. परंतु महाराष्ट्रात इंडिया आघाडीला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे ते म्हणाले. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आजकालच्या राजकारण्यांची भाषा घसरली आहे. शिवराळ झाली आहे, अशी खंत देखील पालेकर यांनी यावेळी व्यक्त केली. कुडाळच्या हॉटेल यशधरामध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेवेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, जिल्हा सचिव मीली मिश्रा, युवा जिल्हाध्यक्ष आदित्य बटावले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दीपेश आजवेलकर उपस्थित होते.

अमित पालेकर म्हणाले की, उबाठा शिवसेना, काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आमची इंडिया आघाडी आहे आणि या इंडिया आघाडीमध्ये आम्ही घटक पक्ष असल्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी विविध ठिकाणी आम्ही सहभाग घेणार आहोत. तसेच महायुतीने केलेले नुकसानीचे राजकारण हे आम्ही दाखवून देणार आहोत. महाराष्ट्र हा सधन प्रदेश आहे, पण यामध्ये विकासात्मक राजकारण दिसत नाही असे सांगून महाराष्ट्रात आम आदमी पक्ष वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी आणि मुंबईमध्ये आमच्या सभा होणार आहेत. आणि याचा फायदा महाविकास आघाडीला सुद्धा होणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी आमची ताकद आहे, त्या ठिकाणी आम्ही आमच्या पक्षासाठी दोन जागा मागणार आहोत. जरी या जागा दिल्या नाहीत तरी इंडिया आघाडीचा प्रचार आम्ही करणार आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले. अमित पालेकर पुढे म्हणाले, आजकालच्या राजकारण्यांची भाषा घसरली आहे. शिवराळ झाली आहे. शिवराळ भाषा बाळासाहेब ठाकरे यांना शोभायची कारण त्या भाषणात आक्रमकता असली तरी एक प्रकारची बौद्धिकता देखील दिसायची. त्यामुळे कोणी शिवराळ भाषण करून बाळासाहेब ठाकरे बनण्याचा प्रयत्न करू नये. असे आम आदमी पक्षाचे गोव्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी सांगितले. राजकारण्यांच्या शिवराळ भाषेबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech