कणकवली : कणकवली तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव-ओटव फाटा येथील पुलावर पुणे ते ओरोस पर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला. पुलावरील रस्ता दुभाजकाच्या संरक्षक कठड्याला आदळून हा अपघात झाला आहे. ही घटना काल, मंगळवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही जीवितहानी झाली नसली तरी काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत वगळता मोठी इजा नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकण्यात आला आहे. या घटनेची माहिती नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी ताबडतोब कणकवली पोलिस ठाण्यात दिल्याने पोलिस ठाण्यातून तत्काळ यंत्राणा कामाला लागली. त्यानंतर तत्काळ कणकवली पोलिस ठाण्याचे हवालदार चंद्रकांत झोरे, माने, प्रणाली जाधव हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच घटनेचा पंचनामा केला. अधिक तपास सुरु आहे.
सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही जीवितहानी झाली नाही मात्र एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वजण मंगळवारी मध्यरात्री गाढ झोपेत असताना 2 वाजता या अपघाताचा मोठा आवाज आला. महामार्गालगत बाजूला असलेल्या नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांना या अपघाताचा आवाज आला. त्यांनी तातडीने मदत मिळण्यासाठी बाजूलाच असलेले सामाजिक कार्यकर्ते भूपेश मोरजकर यांना संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यांनतर लगेचच पोलीस पाटील वृषाली मोरजकर, भुपेश मोरजकर, केदार खोत , प्रभाकर म्हसकर, दीक्षा मोरजकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. घाबरलेल्या मुलांना धीर दिला. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. तसेच घटनेचा पंचनामा करत तपास अधिक तपास सुरु केला आहे.