रत्नागिरीच्या उमेदवारीबाबत चार दिवसांत निर्णय – बाळ माने

0

रत्नागिरी – रत्नागिरीची भाकरी परतायची आहे. जनतेने कौल दिला तर मी निवडणूक लढवणार असून याबाबत पुढील चार दिवसांत निर्णय घेणार असल्याची माहिती माजी आमदार बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. माने म्हणाले की, आज मी ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे. यावेळी भाजपा कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी मतदारसंघात २ लाख ८८ हजार मतदार आहेत. या सर्व जनतेला मी आवाहन करतो की तुम्हाला आमदार कसा हवा आहे? मी निवडणूक लढवावी का, याबाबत प्रतिक्रिया पाठवा. जनतेने कौल दिला तर मी निवडणूक लढवणार आहे. रत्नागिरी वाचवायची आहे, अशी आमची टॅगलाइन आहे. रत्नागिरीकरांना समर्थ पर्याय हवा आहे.

माने म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. येत्या २५ नोव्हेंबरला महायुतीचे सरकार येणार व रत्नागिरीची मंत्रिपदाची परंपरा कायम राहणार आहे. लोकसभेला महायुतीचे उमेदवार माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांना किमान एक लाख मतांची अपेक्षा होती. मात्र ७२ हजार मते मिळाली. परंतु माजी खासदरा विनायक राऊत यांना १० हजाराचे मताधिक्य या मतदारसंघातून मिळाले आहे. त्यामुळेच लोकसभेपासून या मतदारसंघात बदलाची अपेक्षा लोकांना आहे. गेल्या तीन दिवसांत रत्नागिरी विधानसभेत बूथ कमिटीच्या २७ बैठका घेतल्या. त्यात लोकांनी मला निवडणूक लढवण्याचे आवाहन केले आहे. सगळ्या समाजमाध्यमातून कोणती भूमिका घ्यावी, हे सुचवण्यासाठी मतदारांकडून प्रतिक्रियांची, अभिप्रायांची मी येत्या ४ दिवसांत अपेक्षा करत आहे. रत्‍नागिरीकरांना बदल हवा असेल, तर मतदारांनी कळवावे. मतदारांनी सुचवल्यास आपण या निवडणुकीतून माघार घेऊ.

मंत्री उदय सामंत यांनी बाळासाहेबांना न्याय मिळाला पाहिजे, असे वक्तव्य केले होते. ते तुमचे महायुतीतील मित्र आहेत, या प्रश्नाबाबत बाळ माने म्हणाले की, आम्ही खास मित्र नाही. मैत्री दोन्ही बाजूंनी असते. तशी मैत्री असती तर खासदार राणे यांना लाखभर मते मिळायला हवी होती. भाजप-शिवसेनेची गेली ३० वर्षे युती होती. त्यामुळे माझे उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. सध्या महायुती असून अनेक पक्ष एकत्र आले आहेत. मतदार जनता सांगेल त्याप्रमाणे मी निर्णय घेणार असल्याचे बाळ माने यांनी स्पष्ट केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech