सावंतवाडीत राजन तेली यांचे स्वागत
सिंधुदुर्ग – शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनेची गद्दारी करणाऱ्या दीपक केसरकर यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव हेच आमचे “मिशन” आहे. ते डोळ्यासमोर ठेवून पुढील काम करणार आहोत. पुन्हा एकदा स्वगृही परतलो त्याचा आनंद होतो, अशी प्रतिक्रिया माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे दिली. दरम्यान अचानक काही निर्णय बदलल्यामुळे गेले अनेक वर्षे इच्छुक असलेले महाविकास आघाडीतील काही पदाधिकारी नाराज आहेत. त्यांची नाराजी मी चुकीची म्हणणार नाही परंतु दूर करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.
तेली यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आज त्यांचे सावंतवाडी शिवसेनेच्या वतीने येथील शिवसेना शाखेकडे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तेली बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमु बाबुराव धुरी, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तालुका संघटक मायकल डिसोजा, शब्बीर मणियार भारती कासार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी तेली पुढे म्हणाले, या ठिकाणी अनेक वर्षानंतर शिवसेनेत पुन्हा परत आलो याचा मला आनंद आहे. आता या ठिकाणी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. यांच्या विरोधात माझी भूमिका असणार आहे. ज्या शिवसेने सरकारमुळेच त्यांना मंत्रीपद मिळाले त्याच शिवसेनेवर टीका करण्याचे काम मंत्री केसरकर यांनी केले. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव हेच आमचे मिशन असणार आहे. आता कोणावर टीका करणार नाही. सावंतवाडी मतदारसंघाचा विकास आणि प्रलंबित राहिलेले प्रश्न डोळ्यासमोर ठेवून माझे काम असणार आहे. सावंतवाडी मतदारसंघात रोजगाराचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मी प्रयत्न करणार आहेत. दीपक केसरकरांसारखी मी खोटी आश्वासने देऊन कोणाला फसवणार नाही. तर प्रत्यक्षात काय करता येईल त्यासाठी माझा पाठपुरावा असणार आहे, असे ते म्हणाले.