सिंधुदुर्ग – उबाठा शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा असलेल्या दत्ता सामंत यांनी जिल्ह्यातील राजकीय पुढारी आणि जाणकारांना मोठा धक्का दिला आहे. त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असून रविवारी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवधनुष्य जाती घेणार आहेत. यामुळे भाजपला मोठा धक्का बसणार असून शेकडो कार्यकर्ते प्रवेशासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
भाजपमध्ये नाराज असलेले दत्ता सामंत निलेश राणे यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाल्यानंतर नॉट रीचेबल होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या प्रवेश सोहळ्याला सुद्धा ते अनुपस्थित होते. त्यामुळे ते उबाठा शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार राजकीय चर्चा सुरू होती. त्यातच ते मुंबई येथे गेल्याची चर्चा होती. त्यामुळे याला अधिकच दुजोरा मिळत होता. परंतु ते गुरुवारी जिल्ह्यात दाखल झाले. मात्र, मुंबई दौऱ्यात नेमके काय घडले, हे समजत नव्हते.
अखेर शुक्रवारी रात्री पासून सामंत शिवसेनेत जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली होती. दरम्यान, आज सामंत यांनी खा नारायण राणे यांची भेट घेत आपण शिवसेनेत जात असल्याचे सांगत आशीर्वाद घेतले. खा राणे यांनीही त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी आ नितेश राणे, उमेदवार निलेश राणे उपस्थित होते. उद्या रविवारी हा पक्ष प्रवेश मुंबई येथे होणार आहे. यावेळी निलेश राणे सुद्धा उपस्थित राहणार असल्याचे समजते. दरम्यान, पक्ष प्रवेश केल्यानंतर दत्ता सामंत यांच्याकडे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी मुख्यमंत्री देणार असल्याचे समजते.